बीड । वार्ताहर
पाटोदा तालुक्यातील महासांगवी येथील वाळू माफियावर एमपीडीए नुसार कारवाई करण्यात आली. त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेत हर्सूल कारागृहात स्थानबद्ध केले.
अंगद खंडू काळुसे (24, रा.महासांगवी, ता.पाटोदा) असे या कारवाई झालेल्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीचे नाव आहे. पाटोदा व गेवराई पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात सरकारी कर्मचार्यांना मारहाण, सरकारी कामात अडथळा, शिविगाळ यासह इतर गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंद होते. त्याच्यावर यापूर्वी हद्दपारीची कारवाईही झाली होती. मात्र, तरीही त्याचे गुन्हे सुरुच होते.त्यामुळे पाटोदा ठाण्याचे पीआय सिद्धार्थ माने यांनी त्याच्यावर एमपीडीए नुसार कारवाईचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्याकडे पाठवला होता.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भारत राऊत यांनी याबाबत पाठपुरावा केला. जिल्हाधिकारी यांनी त्याच्यावर एमपीडीएनुसार कारवाईचे आदेश काढले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक संतोष जोंधळे, अभिमन्यू औताडे, सतिश कातखडे, रामदास तांदळे, झुंबर गर्जे, संतोष हंगे, विकी सुरवसे, राजू वंजारे यांनी अंगद काळूसे याला ताब्यात घेऊन हर्सूल कारागृहात रवानगी केली.
Leave a comment