आतापर्यंत पाच कोरोनामुक्त घरी परतले
बीड । वार्ताहर
कोरोनामुक्त झालेल्या आणखी दोन जणांना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षातून शुक्रवारी (दि.29) सुटी देण्यात आली. आता जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा 5 इतका झाला आहे. तर, सध्या जिल्ह्यात 49 रुग्ण उपचाराखाली आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत 61 रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यातील 1 मृत्यू झाला 5 बरे झाले तर 6 जण पुण्याला हलवलेले आहेत. शुक्रवारी माजलगावच्या कवडगाव थडी येथील एकाच कुटुंबातील दोन जण कोरोनामुक्त झाले. 18 मे रोजी त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. यात 18 वर्षिय मुलगी आणि 65 वर्षिय वृद्ध आहे. त्यांना कुठलीही लक्षणे नसल्याने आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दहा दिवस उपचार केल्यानंतर सुटी दिली गेली. त्यांना आता पुढील सात दिवस होम क्वारंटाइनच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली.दरम्यान सध्या 49 रुग्णांवर बीड जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. यातील बीडमध्ये उपचार घेणारे चौघांची प्रकृती जोखमीची असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार व त्यांची सर्व टिम रुग्णांना कोरोनामुक्त करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
Leave a comment