गेवराई । वार्ताहर
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या तिन दिवसीय रक्तदान शिबिराला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून पहिल्याच दिवशी 105 रक्तदात्यांनी विक्रमी रक्तदान केले. शिबिराचे उदघाटन आ.सतीष चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गेवराई तालुका राष्ट्रवादी काँगेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोरोनाच्या संकटकाळात राज्यात रक्त तुटवडा असताना सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याबद्दल अनेकांनी उपक्रमाचे कौतुक केले.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या संकटकाळात राज्यात रक्त तुटवडा भासत असल्याने रक्तदानाचे आवाहन केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून र.भ.अट्टल महाविद्यालय गेवराई येथे तीन दिवसीय रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून सामाजिक अंतराचे सर्व नियम यावेळी पाळण्यात आले. अमरसिंह पंडित यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील लोकांनी या शिबिरात सहभाग नोंदविला. पहिल्याच दिवशी 105 रक्तदात्यांनी रक्तदान करून विक्रम केला. औरंगाबाद पदवीधर मतदार संघाचे आ. सतीष चव्हाण यांनी शिबिराचे उदघाटन केले. र.भ.अट्टल महाविद्यालयाच्या वतीने यावेळी गेवराई पोलिसांना एन-95 मास्कचे वाटप करण्यात आले. आ.सतीष चव्हाण यांनी रक्तदान शिबिराच्या आयोजनाबद्दल गेवराई तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कौतुक करून अमरसिंह पंडित यांना शुभेछ्या दिल्या.
कोरोनाच्या संकटकाळात माजी आ.अमरसिंह पंडित यांनी बीड जिल्हा आरोग्य यंत्रणेला यापूर्वी तिन व्हेंटिलेटरची मदत केली आहे. सुमारे पाच हजार गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे कीट वाटप केले आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने पुन्हा एक्सरे मशीन, सहा ई.सी.जी. मशीन, दहा नेब्युलायझर, दोन डिजिटल मॉनिटर, दहा ऑक्सिमीटर, पिपिई कीट, एन-95 मास्क यासह इतर साहित्य आरोग्य विभागासाठी दिले जाणार आहे. रक्तदान व इतर सामाजिक उपक्रमाचे आयोजन सुद्धा तालुकाभर मोठ्या उत्साहात होत आहे. रक्तदान शिबिराच्या निमित्ताने तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, सभापती जगन पाटील काळे, कुमारराव ढाकणे, भरत खरात, जालिंदर पिसाळ, आनंद सुतार, राधेश्याम येवले, सय्यद नजीब, दिपक आतकरे, बब्बु बारूदवाले, गुफरान इनामदार, जिजा पंडित, संदीप मडके, अक्षय पवार, आवेज सेठ, श्याम रुकर, संजय पुरणपोळे, वासिम फारोकी, अमन सुतार, मन्सूर शेख, गोरख शिंदे, अजय पंडित, दत्ता दाभाडे, स्वप्नील येवले प्राचार्या डॉ.रजनी शिखरे यांच्यासह शिवछत्र परिवारावर प्रेम करणार्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.गेवराईमधील डॉक्टर, वकील, पत्रकार, व्यापारी, शिक्षक, प्राध्यापक यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शिबिरामध्ये रक्तदान केले. शिबीर आणखी दोन दिवस सुरु राहणार असून या उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आले.
Leave a comment