शेतकर्यांना बियाणे मिळणार कसे?
बीड । वार्ताहर
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी बीडसह 3 तालुक्यात संचारबंदी लावल्याने खते,बियाणे अन् कीटकनाशकाची बाजारपेठ बंद झाली आहे. त्यामुळे शेतकर्यांना बियाणे, खते मिळणार कशी अन् कधी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा कृषी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सत्यनारायण कासट यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी रेखावार यांना निवेदनही दिले आहे.
बीड जिल्ह्यातील एकूण मालापैकी 70 टक्के माल हा बीड शहरातील वितरकांकडून जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये किरकोळ विक्रेत्यांकडे जात असतो.सध्या शेतकरी वर्गाकडून बियाणे खते औषधे यांचा खरेदी चालू आहे.परंतु 28 मे पासून बीड शहर 4 जूनपर्यंत संपूर्ण बंद झाल्यामुळे जिल्ह्यांमधील बी-बियाणे खते यांची पुरवठा व्यवस्था पूर्णत कोलमडून पडत आहे. होलसेलमध्ये जिल्ह्यातील बियाणे खते विक्रेत्यांना वाहनाद्वारे देण्याची मुभा द्यावी. तसेच प्रशासनाने विक्रेत्यांना त्यांच्या वाहनाने बीड जिल्ह्यातील विविध भागांमध्ये बियाणे औषधीचा पुरवठा करू द्यावा. तसेच कंपन्यांकडून विविध राज्यातून कृषी निविष्ठा नियमित बीड शहरात होलसेल विक्रेत्याकडे येत असते परंतु लॉकडाऊनमुळे बाहेरच्या राज्यातून आलेली वाहने बीड शहराबाहेर उभे आहेत. किराणा दुकान याप्रमाणे कृषि विक्रेत्यांना अत्यावश्यक सेवेअंतर्गत केवळ होलसेल दुकानांना जिल्ह्यातील इतर ठिकाणी माल पाठवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी निवेदनाव्दारे सत्यनाराट कासट यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. त्यामुळे शेतकरी हित समोर ठेवून प्रशासन नेमका काय निर्णय घेते याकडे कृषी विक्रेत्यांसह जिल्हाभरातील शेतकर्यांचे लक्ष लागले आहे.
Leave a comment