केज । वार्ताहर
केज-कळंब रस्त्यावरील एका हॉटेलनजिक एका भरधाव जीपचे टायर फुटून झालेल्या अपघातात कळंब उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक सुरेश पाटील यांचा अंगरक्षक विवेकानंद गिरी यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची ही घटना गुरुवारी (दि.28) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.
केज तालुक्यातील दीपेवडगाव येथील मूळचे रहिवाशी असलेले विवेकानंद विलास गिरी हे उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथे पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत होते. ते कळंब उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक सुरेश पाटील यांचे अंगरक्षक म्हणून कर्तव्य बजवत होते. कर्तव्य बजावून ते आपल्या जीप क्र.(एम एच 44 एस-4302) स्वतः चालवत गुरुवारी सायंकाळी केजकडे येत असताना चिंचोलीपाटी जवळच्या हॉटेलनजिक जीपचे समोरील डाव्या बाजूचे टायर फुटले. त्यामुळे गाडी रस्त्याच्या खाली उतरून एका पळसाच्या झाडाला धडकली व शेतात जाऊन पलटी झाली. या अपघातात विवेकानंद गिरी याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यामुळे त्यांच्या डोक्यातून व कानातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन ते जागीच ठार झाले. माहिती मिळताच निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संतोष मिसळे, सपोउनि कादरी, चाटे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल गायकवाड, मतीन शेख, भास्कर सिरसाट आदी पोलीस कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. त्यांनी मृतदेह गाडीबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय केज येथे पाठविला.
मयत पोलीस विवेकानंद गिरी यांचे वडील कर्मवीर विद्यालय चिंचोली माळी येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तर पत्नी सौ. जयश्री ही देखील युसूफ वडगाव पोलीस स्टेशन येथे पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. त्यांना एक वर्षाची लहान मुलगी हे एक अपत्य तर आई गृहिणी आहे. विवेकानंद गिरी यांच्या अपघाताची माहिती मिळताच कळंब, युसुफवडगाव आणि केज येथील पोलीस कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी हजर झाले. विवेकानंद गिरी हे मनमिळावू आणि प्रेमळ स्वभावाचे असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान कोरोनामुळे पोलिसांवर कामाचा अतिरीक्त कामाचा ताण असून अपघात मृत्यू पावल्यामुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे.
Leave a comment