बीड । वार्ताहर
पाटोदा तालुक्यातील कारेगाव येथील कोरोना बाधित रुग्ण हा बीड शहरासह अनेक भागात मुक्तसंचार केल्याचे समोर आले आहे. तसेच त्याच्यावर ज्या विवेकानंद रुग्णालयात उपचार सुरु होते, त्या रुग्णालयात तीन दिवसात जवळपास 400 रुग्णांची तपासणी करण्यात आली. हे रुग्ण बीड, पाटोदा, केज, गेवराई, वडवणी आणि धारुर या तालुक्यातील असल्यामुळे कोरोनाचा समुह संसर्ग होवू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने बुधवारी रात्री उशिरा बीड शहरासह या पाच तालुक्यातील 13 गावांमध्ये येत्या 4 जूनपर्यंत संपूर्ण संचारबंदी लागू केली आहे.
कारेगाव येथील रुग्ण हा बाधित येण्यापूर्वी बीडच्या विवेकानंद रुग्णालयात उपचारासाठी तीन दिवस दाखल होता. तसेच त्याची सोनोग्राफी दिशा डायग्नोस्टीक येथे व इतर तपासण्या पॅराडाईज रुग्णालयात करण्यात आल्या होत्या. या काळात विवेकानंद रुग्णालयात 400 पेक्षा अधिक रुग्णांची बाह्यरुग्ण विभागात तपासणी करण्यात आली. त्यामुळे हे सर्व रुग्ण ज्या भागातून आले आहेत त्या भागात संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.
यामध्ये बीड शहरासह तालुक्यातील खंडाळा, चर्हाटा, पालवण आणि ईट, पाटोदा तालुक्यातील वैजाळा व डोंगरकिन्ही वडवणी तालुक्यातील देवडी, गेवराई तालुक्याती खांडवी, मादळमोही व धारवंटा तसेच केज तालुक्यातील खरमाटा आणि धारुर तालुक्यातील पारगाव या गावांमध्ये संपूर्ण संचारबंदी 4 जूनपर्यंत लागू करण्यात आली आहे. या भागात विनापरवानगी प्रवेश करता येणार नाही किंवा बाहेरही जाता येणार नाही. वैद्यकीय सेवा, वर्तमानपत्रे व माध्यमविषयक सेवा 24 तास सुरु राहतील. अत्यावश्यक सेवांचे कार्यालय वगळता (महसुल, ग्रामविकास आणि आरोग्य) बीड शहरातील सर्व आस्थापना (शासकीय, खासगी व बँका) बंद राहतील. बीड शहरातील शासकीय कार्यालयाच्या विभाग प्रमुखांना व बँकांना आवश्यकता भासल्यास उपजिल्हाधिकारी रोहयो यांच्याशी संपर्क साधून अत्यावश्यक बाब म्हणून कार्यालय उघडण्याची व मर्यादीत कर्मचार्यांना बोलावण्याची परवानगी देण्यात येईल. बीड शहरासह संचारबंदी असलेल्या सर्व गावातील लोकांना जिल्ह्यात व राज्यात जाण्यासाडी मेडिकल इर्मजन्सी वगळता पास मिळणार नाही असेही या आदेशात नमुद केले आहे.
Leave a comment