नवी दिल्लीः देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. अशात सुप्रीम कोर्टाने एक मोठा निर्णय दिला आहे. आता खासगी लॅबमध्येही लोक मोफत करोनाची चाचणी करु शकतात. आधी खासगी लॅबमध्ये करोनाच्या टेस्टसाठी ४ हजार ५०० रुपयांपर्यंतचे शुल्क आकारण्यास संमती होती. मात्र आता सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशामुळे खासगी लॅबमध्येही चाचणी मोफत होईल असं म्हटलं आहे.
सुप्रीम वकील शशांक देव सुधी यांनी केलेली मागणी रास्त आहे असं म्हणत आता खासगी लॅबमध्ये करोनाची चाचणी मोफत होईल असा निर्णय दिला आहे. देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. अशात चाचण्या जेवढ्या होतील तेवढी रुग्णसंख्या जास्त प्रमाणात कळू शकेल असंही कोर्टाने म्हटलं आहे. ज्या खासगी लॅब्सना करोना चाचणी करण्याची संमती दिली आहे, त्यांना सरकारने कोर्टाच्या निर्णयाची माहिती द्यावी. करोनाची चाचणी मोफत केली गेली पाहिजे याबद्दलचे निर्देश त्यांना सरकारने द्यावेत असंही कोर्टाने म्हटलं आहे. या प्रकरणातल्या पुढल्या सुनावणी दरम्यान खासगी लॅबना या चाचण्यांसाठी काही विशिष्ट निधी द्यायचा का? यावर विचार केला जाईल. तूर्तास लोकांच्या चाचण्या मोफत होणं आवश्यक आहे असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.
Leave a comment