आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथील घटना
आष्टी । रघुनाथ कर्डिले
आष्टी तालुक्यात गेल्या सहा महिन्यापासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून आजपर्यंत अनेक गावांमध्ये बिबट्याने दर्शन दिल्याने नागरीकांची धांदल उडाली आहे दररोज कोणत्या ना कोणत्या गावात बिबट्याचे नागरिकांना दर्शन होत असल्यामुळे घराबाहेर पडणेही मुश्कील होऊन बसले आहे. बुधवार दि.27 रोजी लिंबोडी येथे रानडुकरे पकडण्यासाठी लावलेल्या जाळ्यात चक्क बिबट्या फसला मात्र चतुराईने त्या बिबट्याने जाळे तोडून पलायन केले.यावर वनविभाग मात्र गप्प असुन किती लोकांचा जीव गेल्यावर बिबट्या पकडणार असा सवाल उपस्थित होत आहे.
लिंबोडी ता.आष्टी येथे तलावाशेजारी अशोक आंधळे यांचा तीन एकर उस असून या उसाच्या फडात अज्ञात लोकांनी रानडुकर पकडण्यासाठी जाळं लावल असता त्या जाळ्यामध्ये रानडुक्कराऐवजी बिबट्या अडकताच तेथील अज्ञात रानडुकराची शिकार करणार्यांनी धूम ठोकली.पाहता पाहता ही बातमी गावात पसरताच स्थानिक शेतकर्यांनी तेथील ऊसाच्या फडाला वेडा टाकला.बिबट्या बाहेर येण्यासाठी फटाके फोडले मात्र बिबट्या काही बाहेर आला नाही. त्यामुळे लिंबोडी, देवीनिमगाव, कडा, केरूळ,आंधळवस्ती, पाटण, खिळद,चाटेगोठे, महाजनवाडी आदी परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. याबाबत आष्टीचे वनाधिकारी सिरसाट यांच्याशी संपर्क केला असता आम्ही त्या ठिकाणी कर्मचारी पाठवले असल्याचे सांगितले.ज्या परिसरात आज बिबट्याचे दर्शन झाले आहे तो परिसर सांगवी पाटणजवळ असून याठिकाणी कोरोणाचे रुग्ण आढळून आल्याने हा परिसर बफर झोनमध्ये असून अनिश्चित काळासाठी बंद आहे. याकडे वनविभाग प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन पिंजरा लावून बिबट्या पकडण्याची मागणी होत आहे.
शिरापूर शिवारात बिबट्याचा मुक्तसंचार?
आष्टी तालुक्यातील शिरापूर येथे गेल्या सहा महिन्यापासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून दररोज या भागात बिबट्याचे दर्शन होत आहे.सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास शिरापुर मेहेकरी रस्त्यावर हा बिबट्या दिसून येत असून दुचाकी व चारचाकी च्या मागे धावत असल्याचे अनेकांनी सांगितले.दोन दिवसांपूर्वीच मेहेकरी येथील एका दुचाकीच्या मागे बिबट्या धावत जाऊन तो दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला जाऊन आदळला त्यानंतर त्याने त्याच्या हातावर पंजा मारला मात्र तो दुचाकीस्वार यातून कसाबसा तरी वाचला आहे.या बिबट्याचा वनविभागाने कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते बिभीषण कवडे यांनी केली आहे.
Leave a comment