वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती
बीड | सुशील देशमुख
कोरोनाशी यशस्वी लढा देऊन दोन कोरोनामुक्त रुग्ण बुधवारी (दि.27) घरी परतले.जिल्हा रुग्णालयातून घरी पाठवताना या रुग्णांना पाठबळ देण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी राधाकिशन पवार, उपचार करणारे जिल्हा रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका उपस्थित होत्या. रुग्णालय प्रशासनाने प्रकृती ठणठणीत झालेल्या त्या दोन्ही रुग्णांना पोलीस बँड व टाळ्या वाजवून त्यांना प्रेमाचा निरोप दिला.शिवाय कोरोना रुग्ण योग्य उपचारानंतर बरा होतो हा संदेशही यानिमित्ताने इतरांना दिला.
कोरोनामुक्त झालेले हे रुग्ण
गेवराई व माजलगाव तालुक्यातील आहेत. यात एक 12 वर्षीय मुलगी आणि 29 वर्षाच्या तरुणाचा समावेश आहे.ते मुंबईहून आले होते.आयसीएमआरच्या निर्देशानुसार गत 10 दिवसांपासून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात औषधोपचार सुरू होते. डायट प्लॅन नुसार योग्य आहार, प्राणायम, रोगप्रतिकारक शक्तिवर्धक पेय याबरोबरच मानसिक आधार या सर्व पातळीवर उपचार करण्यात आले.कोरोना वॉर्डमधील डॉक्टर, आरोग्य कर्मचारी अथक परिश्रम घेत आहेत अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली.
बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यातील एक रुग्णाचा अपवाद वगळता 15 मे पर्यंत जिल्ह्यात दुसरा बाधीत रुग्ण सापडला नव्हता.दुसरीकडे कोरोनाचे संभाव्य संकट लक्षात घेता जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज झाली होती. विलगीकरण कक्षातील बेडची संख्या वाढवण्यात आली. व्हेंटिलेटरसह इतर आवश्यक साधन सामुग्री उपलब्ध करून घेतली गेली.उपचार करणाऱ्या डॉक्टर, परिचारिकांसाठी पर्सनल प्रोटेक्शन इक्यूपमेंट (पीपीई) कीट आदींची व्यवस्था केली गेली असून 24 तास डॉक्टरांच्या निगराणीखाली बाधितांवर उपचार होतील अशी व्यवस्था केली गेली आहे.
16 मे पासून जिल्ह्यात बाधीत रुग्णांचा आकडा वाढू लागला. इटकूरच्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला अन कोरोनापासून लांब असलेल्या बीड जिल्ह्यात चिंता वाढली. त्यानंतर हिवरा ते पुढे 26 मे रोजी परळी, शिरूर अन् पाटोदा तालुक्यात निष्पन्न झालेले 6 बाधीत. अवघ्या 10-11दिवसात जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 55 पर्यंत पोहोचला. यातील 6 जण पुण्यात उपचार घेत आहेत, एका महिला रुग्णाचा मृत्यू झाला तर 1 रुग्ण यापूर्वीच कोरोनामुक्त झालेला आहे. सध्या जिल्ह्यात 47 कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
महत्त्वाचे हे की , यातीलच 2 रुग्णांची प्रकृती ठीक झाल्यानंतर आज बुधवारी सकाळी 10.30 वाजता त्यांना रुग्णालयातून प्रेमाचा निरोप देण्यात आला. रुग्णालयातून सुट्टी मिळताना डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांकडून झालेल्या स्वागताने ते दोन्ही रुग्ण हरखून गेले होते.दरम्यान आरोग्य कर्मचारी यांनी निरोप देताना 12 वर्षीय मुलीचा वाढदिवस केक कापून साजरा केला अशी माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.
Leave a comment