बीड । वार्ताहर

जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी कोरोना संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी व अन्य अधिकार्‍यांसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह महत्वपूर्ण बैठक घेतली. लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून ही 8 वी बैठक होती. या बैठकीदरम्यान मुंडे यांनी जिल्ह्यातील वाढत्या रुग्णसंख्येवर चिंता व्यक्त केली. जिल्ह्यातील कोरोना रुग्णालये, खाटा, व्हेंटिलेटर्स, औषध साठा यासह विविध सुविधांचा आढावा घेतला. केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात बाहेरून येणार्‍या नागरिकांना परवानगी देण्यात आली, त्यानंतर जिल्ह्यात आतापर्यंत 41 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

मुंडे यांनी या आढावा बैठकीत जिल्ह्यात आणखी वेगाने सुरू झालेली कापूस खरेदी, बी बियाणांची उपलब्धता आदी विषयांकडेही लक्ष वेधले. बीड जिल्ह्यात वार्षिक विकास योजनेतून मार्च 2020 अखेर पर्यंत करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा व त्यासाठी खर्च करण्यात आलेल्या निधीचा समग्र आढावा यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सादर करण्यात आला. यावेळी मुंडे यांच्यासह आ.प्रकाशदादा सोळंके, आ.बाळासाहेब आजबे, आ.संदीप क्षीरसागर, आ.संजय दौंड, माजी आ.अमरसिंह पंडित, शिवाजी शिरसाट, वाल्मिक अण्णा कराड, अजय मुंडे तसेच जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात, जिल्हा नियोजन अधिकारी श्री.आगवणे यांसह आदी उपस्थित होते.

जिल्हा वार्षिक विकास योजनेतून आतापर्यंत आरोग्य विभागाला वितरित केलेल्या 11 कोटी रुपये निधीतून खरेदी केलेल्या आरोग्यविषयक सामग्रीचाही यावेळी व्यापक आढावा घेण्यात आला. तसेच तालुका स्तरावरील ग्रामीण रुग्णालयांमध्ये आवश्यक असणार्‍या उपाययोजनांसाठी ना.मुंडेंनी यावेळी संबंधितांना सूचना दिल्या. दरम्यान केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात आजपासून शिथिलता कालावधी दररोज 11 तासांपर्यंत वाढवण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर ना. धनंजय मुंडे यांनी नागरिकांना जीवनावश्यक खरेदीसह सर्वत्र सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे तसेच कोणत्याही परिस्थितीत घाबरून न जाता शासकीय नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. बाहेरून येणार्‍या नागरिकांनी आरोग्य तपासणी करावी, क्वारंटाईन राहण्यासह आवश्यक खबरदारी घ्यावी, इतरांशी संपर्क टाळावा; तसेच कोणत्याच परिस्थितीत माहिती लपवून स्वतःचे व आपल्या निकटवर्तीयांचे आरोग्य धोक्यात टाकू नये असे आवाहन केले आहे. अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे कोरोना चाचणी प्रयोगशाळेस मागील काही दिवसांपूर्वी ना. मुंडे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजुरी मिळाली होती, जिल्ह्यातील स्वॅब तपासणीचा आलेख व वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, येत्या 8 दिवसांच्या आत ही प्रयोगशाळा प्रत्यक्ष सुरू होणार असून, अंबेजोगाई येथेच आता कोरोना चाचणी करणे शक्य होणार आहे असे मुंडे म्हणाले. मागील आठवड्यात मुंडे यांनी स्वाराती रुग्णालयात भेट देऊन तेथील एमआरआय मशीनची अनेक दिवसांची मागणी पूर्ण केली होती. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसात हाफकीन महामंडळामार्फत 7 व्हेंटलेटर्स देखील मिळवून दिले होते.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.