र्शॉर्टसर्किटने आग: 20 लाखांचे नुकसान
बीड । वार्ताहर
गेवराई तालुक्यातील हिरापूर येथे टाळेबंदीमुळे बंद हॉटेलला शॉर्टसर्किटने आग लागली. काही क्षणात आगीने रौद्ररुप धारण केले. शेजारीच असलेल्या पाण्याच्या जारच्या प्लँटलाही आगीने कवेत घेतले. दोन्हीचे मिळून तब्बल 20 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. ही घटना मंगळवारी (दि.26) दुपारी 3 वाजता घडली.
धुळे- सोलापूर महामार्गावरील पाडळसिंगी जवळील टोलनाक्यालगत हिरापूर शिवारात मधुकर मुंजाळ यांचे हॉटेल आहे. या हॉटेलला चिकटूनच त्यांचे बंधू दत्ता मुंजाळ यांचा जारच्या पाण्याचा प्लँट आहे. लॉकडाऊनमुळे सध्या हॉटेल बंद आहे. मंगळवारी दुपारी तीन वाजता मधुकर मुंजाळ यांच्या बंद हॉटेलातून धुराचे लोळ बाहेर येत असल्याचे परिसरातील नागरिकांनी पाहिले. त्यानंतर त्यांनी तेथे धाव घेतली. तोपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केले. त्यानंतर आग शेजारीच असलेल्या जारच्या पाण्याच्या प्लँटपर्यंत पोहोचली. पाहता- पाहता या प्लँटलाही आगीने चोहोबाजूंनी घेरले. बोअर सुरु करुन आग विझविण्याचे प्रयत्नही निष्फळ ठरले. बीड व गेवराईहून अग्निशामक दलाचे बंब पाचारण करण्यात आले. तोपर्यंत हॉटेलातील खुर्च्या, टेबल, फर्निचर, धान्य व इतर साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. यात 10 लाखांचे नुकसान झाल्याचा दावा हॉटेलमालक मधुकर मुंजाळ यांनी केला. दत्ता मुंजाळ यांच्या पाणी प्लँटमधील सहाशे रिकामे जार, महागडे यंत्र व इतर उपकरणेही आगीत खाक झाली. यामध्येही जवळपास दहा लाखांची हानी झाल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, घटनास्थळी गेवराई ठाण्याचे सहायक निरीक्षक संदीप काळे यांनी तेथे धाव घेतली. उशिरापर्यंत पोलिसांत नोंद करण्याचे काम सुरु होते. माजी आ. अमरसिंह पंडित यांनीही तेथे भेट दिली.
अडीच तासानंतर आग आटोक्यात
दुपारी तीन वाजता आग लागल्यानंतर स्थानिकांनी गेवराई पालिकेच्या अग्निशामक दलाशी संपर्क केला. याचवेळी बीडहून अग्निशामक दलाचा बंबही पाचारण केला. दोन बंबांच्या सहाय्याने अग्निशामक दलाच्या जवानांनी साडेपाच वाजता अडीच तासाच्या परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली. गेवराई पालिकेचा अग्निशामक बंब उशिरा पोहोचल्याने नाराजी व्यक्त होत होती.
Leave a comment