बीड । वार्ताहर
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सोमवारी (दि.25) सायंकाळी सुधारित आदेश जारी केल्यानंतर आता आज मंगळवारपासून (दि.26) जिल्ह्यातील सर्व आस्थापना- दुकाने सकाळी 7.30 ते सायंकाळी 6.30 वा. पर्यंतच्या कालावधीत दररोज चालू राहणार आहेत. 24 मार्चला बंद झालेली बाजारपेठ आजपासून पूर्ण क्षमतेने सुरु झाली आहे. मात्र नागरिकांनी स्वत:ची काळजी घेतानाच प्रशासनाचे सर्व नियम पाळून अतिशय जबाबदारीने वागणे आवश्यक आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची मंगळवारपासून अंमलबजावणी सुरु झाल्याचे चित्र शहर व ग्रामीण भागात मंगळवारी सकाळी दिसून आले. मागील दोन महिन्यांपासून बंद असलेली बीडमधील व्यापारपेठ आज पहिल्यांच उघडली. यापूर्वी एक दिवसाआड संचारबंदी शिथिलतेच्या काळात काही आस्थापना उघडल्या जात होत्या, मात्र सोमवारच्या आदेशानुसार सर्व आस्थापनांना सुरु करण्यास परवनागी मिळाली. त्यामुळे सकाळपासूनच व्यापारी दुकानाची स्वच्छता आणि झाडलोट करण्यात मग्न झाल्याचे दिसून आले. शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या सुभाष रोडवर नागरिक दिसून आले. मात्र प्रत्येकाने तोंडाला मास्क बांधलेला दिसत होता. कोरोनाचे संकट लक्षात घेवून प्रत्येकजण आता काळजी घेत सामाजिक अंतर राखताना दिसत आहे. शहरातील कापड बाजार, किराणा दुकानांपासून ते इलेक्ट्रानिक्स दुकाने, पक्ंचरची दुकाने, हातगाडे, तसेच गॅरेज लाईन उघडली गेली. व्यापार्यांनी दुकानाची सर्व स्वच्छता करुन नंतर आपला व्यवसाय सुरु केला. दररोज सकाळी सात ते सायंकाळी साडेसहापर्यंत दुकाने उघडी ठेवता येणार असल्याने 11 तासांचा वेळ मिळाला आहे. त्यामुळे दुकानांची पूर्वीप्रमाणे स्वच्छता, सजावट करुन वस्तू, साहित्यावर निटनेटके ठेवण्यात व्यापारी गुंतले होते. नागरिकही दुचाकी, चारचाकीतून खरेदीसाठी घराबाहेर पडले होते. दरम्यान दुपारी तापमानाचा पारा वाढत गेल्यानंतर मात्र रस्त्यांवरील गर्दी कमी होत गेली. कामाशिवाय घराबाहेर पडू नका, हे प्रशासनाने केलेले आवाहन नागरिकांनीही आता मनावर घेतल्याचे चित्र यानिमित्ताने दिसून आले.
Leave a comment