फेसबुक लाईव्हदारे जिल्हाधिकार्यांचा नागरिकांशी संवाद
बीड । वार्ताहर
जिल्ह्यातील सर्व आस्थापना आणि दुकाने सुरु करण्यास जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सोमवारी (दि.25) सायंकाळी नव्या आदेशानुसार परवानगी दिली आहे. कोरोनाचे समोर असलेले संकट आणि जिल्ह्यात दिलेली शिथिलता तसेच शासनाचे आदेश, अशावेळी दुकानदार, व्यापार्यांनी तसेच नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी? गावपातळीवर कोणत्या सेवा मिळणार आहेत? यासह विविध मुद्यांवर आज मंगळवारी (दि.26) सकाळी 9 ते 10 या वेळेत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी फेसबुक लाईव्हद्वारे बीड जिल्हा वासीयांशी संवाद साधला. बीड जिल्ह्यातील नागरिकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना जिल्हाधिकार्यांनी उत्तरे देत त्यांचे समाधान केले.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये शंभर टक्के क्षमतेने सुरु होतील. त्यामुळे शासकीय कामकाजासाठी नागरिकांना कोणतीही अडचण येणार नाही. तसेच लग्न समारंभास वधू, वर व 10 वर्हाडी अशी परवानगी आहे. यापेक्षा अधिकची गर्दी करु नये.शाळा,क्लास आताच सुरु होणा नाहीत. जिल्ह्यात कोणतेही सामुहिक क्रीडा स्पर्धा भरवण्यात येऊ नयेत. रेशनकार्ड नाही त्यांनाही रेशन मिळेल गावपातळीवर यासाठी यादी सुरु आहे. रेशन कार्डला आधार लिंक नसेल तर आठवडाभरात करावी. मे,जूनमध्ये दाळही मिळणार आहे.गावपातळीवर मेळावे घेऊन शेतकर्यांना पीक कर्ज देण्याचे प्रयत्न केला जाईल. कापूस खरेदीही सुरु आहे. राष्ट्रीयकृत बँकेत नागरिकांनी खाते उघडावे, कारण सर्व योजनांचे अनुदान थेट खात्यावर मिळेल. बँकेत येण्याऐवजी गावात ग्राहक सेवा केंद्र, पोस्टातून पैसे काढता येतील.याची पावती मिळाली नाही तरी मेसेजद्वारे व्यवहाराबाबत कळवले जाईल असेही जिल्हाधिकारी रेखावार यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.
24 तासात मिळणार ई-पास
जिल्हाधिकारी म्हणाले, नागरिकांना कोणत्याही कारणाने जिल्ह्याबाहेर जाण्यास पास आवश्यक आहे.24 तासांत तो प्रशासनाकडून उपलब्ध करुन दिला जाईल. पाटोदा-आष्टी प्रवासास पास लागेल. बाहेर जिल्ह्यातून आल्यावर 28 दिवस क्वारंटाईन रहावे लागेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
गर्दी टाळण्यासाठी आठवडी बाजार बंद राहणार
भाजीपाला आडत व आठवडी बाजार बंदच राहतील. इथे गर्दी होत असल्याने ते आताच सुरु होणार नाहीत. भाजी विक्रीस शेतकरी गटांना परवानगी दिलेली आहे.फेरीवाले फिरुन विक्री करु शकतात. दुकानात गर्दी करु नये,हॉटेल, मेस यांना केवळ पार्सल सुविधा देता येतील. लोकांना बसवून जेवू घालता येणार नाही असेही जिल्हाधिकारी रेखावार यांनी सांगीतले.
Leave a comment