सात प्रलंबित रिपोर्ट उद्या मंगळवारी मिळणार
बीड | वार्ताहर
जिल्ह्यातून सोमवारी पाठवलेल्या 57 पैकी 50 व्यक्तींचे रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे मागील पाच दिवसांपासून टेन्शनमध्ये असलेल्या बीड जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे. उर्वरित 7 प्रलंबित रिपोर्ट उद्या म्हणजे मंगळवारी जिल्हा रुग्णालय प्रशासनाला प्राप्त होतील अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली.
जिल्ह्यातील आजपर्यंतचे बाधीत रूग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 47 कोरोनाबाधीतांची नोंद झाली आहे. यातील पिंपळा (ता.आष्टी) येथील रूग्ण कोरोनामुक्त झाला आहे. त्यानंतर इटकूर (ता.गेवराई) येथे 2, हिवरा (ता.माजलगाव) येथे 1, पाटणसांगवी (ता.आष्टी) येथे 7 बाधीत रूग्ण आढळले पैकी एका महिला रूग्णाचा बीडमध्ये मृत्यू तर उर्वरित सहा जण उपचारासाठी पुणे येथे दाखल झाले आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. कवडगाव थडी (ता.माजलगाव) 2, सुर्डी (ता.माजलगाव) 1, नित्रुड (ता.माजलगाव) 6, कुंडी (ता.धारूर) 7, वडवणी 2, पाटोदा शहर 1, वहाली (ता.पाटोदा) 2, चंदनसावरगाव (ता.केज) 1, संभाजीनगर बालेपीर बीड येथील 1 रूग्ण, हे सर्व बाधीत रूग्ण मुंबईतून जिल्ह्यात परतलेले आहेत. याशिवाय केळगाव (ता.केज) येथील 1 जण पनवेलमधून तर बीड शहरातील मोमीनपुरा येथील 2 व जयभवानीनगर बीड येथील 1 असे तिघे ठाण्यातून बीडला आलेले आहेत. धनगरवाडी (ता.आष्टी) येथे आढळलेला 1 रूग्ण मुंबईतून आलेला आहे. रविवारी (दि.24) 40 पैकी 6 जणांचे स्वॅब अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात साखरे बोरगाव (ता.बीड) येथील 3, पाटोदा शहरील 1 आणि वडवणी येथील 2 जणांचा समावेश आहे. हे सर्व जण मुंबईहून गावी परतले होते. रविवारपर्यंत जिल्ह्यात एकूण 47 बाधीत रूग्णांची नोंद असून पैकी 1 जण कोरोनामुक्त झालेला असुन एकाचा मृत्यू झाला आहे. तर 6 जणांवर पुणे येथे उपचार सुरू असल्याने बीड जिल्ह्यात उपचार घेणार्या रूग्णांची संख्या 39 इतकी आहे.आता सोमवारचे तब्बल 50 रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
Leave a comment