माजलगाव । वार्ताहर
मानवी हक्क अभियानचे संस्थापक अॅड.एकनाथराव आवाड यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून मानवी हक्क अभियानचे सामाजिक कार्यकर्ते तथा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता कांबळे यांनी चाटगाव येथील दिव्यांग प्रभाकर घनघाव यांच्या कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे मोफत वाटप केले.
चाटगाव येथील प्रभाकर घनघाव हे दिव्यांग असून त्यांच्या कुटुंबियांना मानवी हक्क अभियानचे संस्थापकअॅड.एकनाथराव आवाड यांच्या स्मृतिदिनानिमित्त चाटगाव येथे घनघाव यांच्या निवासस्थानी भेट देवून जीवनावश्यक वस्तू दिल्या. यावेळी दत्ता कांबळे यांच्या समवेत पत्रकार बाबा देशमाने, भगीरथ तोडकरी, अॅड.उमेश गडसिंग, सामाजिक कार्यकर्ते दीपक गडसिंग, सिध्दार्थ देशमाने आदींची उपस्थिती होती. चाटगाव येथील प्रभाकर घनघाव यांना कँन्सर झाल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांचा डावा पाय कापण्यात आला. त्यांचा धाकटा मुलगा उत्तम हा मनोरूग्ण असल्याने सर्व कुटुंबाची जबाबदारी प्रभाकर यांच्या पत्नी लताबाई घनघाव यांच्यावर पडलेली आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लताबाईंचे रोजंदारीचे काम बंद असल्याने समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येवून घनघाव कुटुंबियांना मदत करण्याची गरज आहे.
Leave a comment