बीड | वार्ताहर
मुंबईहून गावी परतलेल्या एका मानसिक रुग्णाचा गावाबाहेर अलगीकरणात असताना मृत्यू झाला. रविवारी (दि.24) सायंकाळी नवगण राजुरी (ता.बीड) येथे घडली. आरोग्य विभागाने त्याचा स्वॅब तपासणीला प्रयोगशाळेत पाठविला आहे.अहवाल आल्यानंतरच त्याला कोरोनाची बाधा झाली होती की अन्य कारणाने त्याचा मृत्यू झाला हे स्पष्ट होणार आहे.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिशन पवार यांनी याबाबत आढावा घेतला.
नवगण राजुरी येथील एक कुटूंब मुंबईला वास्तव्यास होते, मात्र तिकडे दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढू लागले. त्यामुळे ते २० मे रोजी गावी आले होते. यात दोन महिलांसह दोन पुरूषांचा समावेश आहे. या सर्वांचे गावाबाहेर अलगीकरण करण्यात आले होते. यात ४२ वर्षीय व्यक्तीला मानसिक आजार होता. त्यांच्यावर औषधोपचारही सुरू होते.
आरोग्य विभागाच्या पथकाकडून त्यांना भेटी देण्यासह तपासणी केली जात होती. यात कोणालाही लक्षणे दिसली नाहीत, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्तात्रय राऊत यांनी सांगितले. दरम्यान, रविवारी सायंकाळच्या सुमारास या व्यक्तीची काहीच हालचाल होत नसल्याचे पाहून इतर नातेवाईकांनी सरपंचाला संपर्क केला. त्यांनी रुग्णवाहिका बोलावून जिल्हा रुग्णालयात आणले. येथे तपासून त्याला मृत घोषित केले.
Leave a comment