कोळकानडी येथील पाच वर्षांपूर्वीच्या प्रकरणात खूनाचा गुन्हा
अंबाजोगाई । वार्ताहर
पाच वर्षापुर्वी तालुक्यातील कोळकानडी शिवारात एका 35 वर्षीय महिलेचा विहीरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणात तेव्हा आकस्मिक मृत्यूची नोंद ग्रामीण ठाण्यात झाली होती, मात्र पोलीसांनी हे प्रकरण पुन्हा तपासावर घेतल्यावर हा खूनाचा प्रकार असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन अज्ञाताविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मीरा लिंगमुर्ती आकुसकर(35) असे त्या मयत महिलेचे नाव आहे. कोळकानडी शिवारात दि.16 नोव्हेंबर 2015 या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाला होता.याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.दरम्यान शवविच्छेदनानंतर सदर महिलेचा मृत्यू हा गळ्यावर दाब येवून झाल्याचे वैद्यकीय अहवालात निष्पन्न झाले. त्या अनुषंगाने पोलीसांनी तपास सुरू केला. अज्ञात व्यक्तीने कुठल्या तरी कारणावरून सदर महिलेचा गळा दाबून खून केला व पुरावे नष्ट करण्यासाठी त्या महिलेस विहिरीत फेकून दिल्याचा संशय पोलीसांकडून व्यक्त केला जात आहे.वैद्यकीय अंतीम अहवालाच्या आधारे मयत महिलेच्या मृत्युप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास सावंत यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरूद्ध गळा दाबून खून करून पुरावे नष्ट केल्याच्या आरोपावरून अज्ञात आरोपीविरूद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात दि.23 गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक महादेव राउत अधिक तपास करत आहेत.तांत्रिक अडचणींमुळे खूनाचा गुन्हा पाच वर्षानंतर दाखल होत असल्याचे पोलीसांकडून सांगण्यात येत आहे.
Leave a comment