'
शनिवारी पंतप्रधान-मुख्यमंत्री यांच्यात चर्चा
नवी दिल्ली / वृत्तसेवा
देशात फैलावत असलेल्या करोना विषाणूचं संकट आणि लॉकडाऊनवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज सर्वपक्षीय बैठकीत चर्चा केली. पंतप्रधानांसोबत या बैठकीत काँग्रेससहीत विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांनी सहभाग घेतला. पंतप्रधान मोदींनी या बैठकीत सरकारद्वारे करोना संकटाशी दोन हात करण्यासाठी सुरू असलेल्या कार्यांची माहिती दिली तसंच इतर नेत्यांकडूनही सूचना घेतल्या. सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याचे संकेत दिले आहेत.
कोविड १९ मुळे आजवर देशात १४९ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. लॉकडाऊन संपण्यापूर्वीच अर्थात ११ एप्रिल रोजी पुन्हा एकदा सर्व राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार असल्याचं या बैठकीत पंतप्रधान मोदींनी म्हटलं.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अगोदरच लॉकडाऊन वाढवण्याचा आग्रह केला होता. पंतप्रधान मोदी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांसोबत आणखी एक बैठक घेतल्यानंतर लॉकडाऊनवर अंतिम निर्णय घेऊ शकतात, असं म्हटलं जातंय.
मोदींनी याअगोदर वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांशीही चर्चा केली आहे. देशातील सर्व मुख्यमंत्री, डॉक्टर आणि मीडियाशीही त्यांनी याअगोदर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधलाय. याशिवाय माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जी, माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा आणि मनमोहन सिंह यांच्याशीही मोदींनी चर्चा केलीय.
बैठकीअगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: या बैठकीत सहभागी होणार नाहीत. पक्षाचे नेते सुदीप बंदोपाध्याय ही बैठक घेतील असं सांगितलं जातं होतं. परंतु, नरेंद्र मोदी या बैठकीसाठी दाखल झाले.
या बैठकीत भाजप, काँग्रेस, डीएमके, एआयएडीएमके, टीआरएस, सीपीआयएम, टीएमसी, शिवसेना, राष्ट्रवादी, अकाली दल, एलजेपी, जेडीयू, एसपी, बीएसपी, वायएसआर काँग्रेस आणि बीजेडी या पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित झाले होते.
Leave a comment