फोटो - बोरगाव थडी)
तलवाडा । वार्ताहर
गेवराई तालुक्यात असलेल्या गोदापट्टयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देखील वाळू तस्करांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून जिल्हाधिकारी आणि महसूल विभागाने कारवाया करून देखील गोदापात्रातून विविध ठिकाणाहून बिनधास्तपणे वाळूचा उपसा, साठा व विक्री सुरूच असल्याचे चित्र आजही पहावयास मिळत आहे.
तलवाडा पोलिस ठाणे हद्दीतील बोरगावथडी येथील गोदावरी नदीपात्रातून दररोज वाळूचा उपसा करून साठा करणे व त्या वाळूची ट्रॅक्टरच्या माध्यमातून तलवाडा व परिसरात खुलेआमपणे विक्री केली जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. वाळू माफिया कोण आहेत याची माहिती महसूल विभागाचे कर्मचारी व तलवाडा पोलिसांना माहित असूनही ते जणूकाही त्यांना काहीच माहित नाही असा आव आणत आहेत. पोलिसांच्या आशिर्वादाने वाळूची वाहतुक होत असून ते याकडे दुर्लक्ष का करतात असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. जर वर्तमानपत्रात बातम्या प्रसिद्ध झाल्या तर उलटा चोर कोतवाल को डाटे याप्रमाणे ते कुठे वाळू साठा व वाहतुक सुरू आहे अशी विचारणा करतात. हप्तेखोर पोलिस व महसूल विभागाच्या आशिर्वादाने वाळूची तस्करी जोमात सुरू असून याकडे जिल्हाधिकारी बीड यांनी जातीने लक्ष देऊन बोरगावथडी येथे सुरू असलेल्या वाळू उपसा, साठा व विक्रीला पायबंद घालण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी लोकांकडून होऊ लागली आहे.
Leave a comment