बीड | वार्ताहर
जिल्ह्यातील पणन महासंघ आणि केंद्रिय कापुस निगमची कापुस खरेदी केंद्रे शनिवार दि.२३, दि.२४ व दि.२५ मे रोजी सुरु ठेवण्यात यावीत व प्रत्येक शनिवारी कापुस खरेदी केंद्रे सुरु ठेवण्यात यावीत असे शिवाजी बड़े, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था,बीड यांनी आदेश केले आहेत.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे मान्यतेने जिल्ह्यातील प्राथमिक नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचा FAQ दर्जाचा कापुस पावसाळयापुर्वी खरेदी करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात सुरु असलेले पणन महासंघ व केंद्रिय कापुस निगम (CCI) यांच्या सर्व कापुस खरेदी केंद्रावर दररोज प्रत्येकी ८० ते १०० वाहनाचे मोजमाप करण्यात यावे असे सूचित केले आहे. मार्च-२०२० पासुन राज्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव व प्रसार यात झपाट्याने वाढ होत असुन, बीड जिल्ह्यात सुध्दा कोरोना बाधित व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.यामुळे केंद्र व राज्य शासनाद्वारे लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे.अद्यापही लॉकडाऊन कायम असुन सद्यस्थितीत थोडी सवलत देण्यात आलेली आहे.
जिल्ह्यात प्रामुख्याने कापसाचे पिक जास्त प्रमाणात घेतले जाते.जिल्ह्यातील कापुस बिक्री साठी बाजार समित्यांकडे दि.१३ मार्च २०२० पर्यंत प्राथमिक नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या २४९२१ एवढी असुन त्यापैकी अद्याप २१ हजार शेतकऱ्यांचा कापुस विक्री होणे बाकी आहे. सदर कापुस हा लॉकडाऊन कालावधीत विक्री होऊ शकलेला नाही. त्यामुळे शेतकरी त्यांनी घेतलेल्या पिक कर्जाची परतफेड करु शकलेले नाहीत. सदर कापुस हा शेतकऱ्यां कडेच घरी साठवून ठेवलेला आहे.पुढील वर्षाचे खरिप हंगामाची पूर्व तयारी जसे बि-बियाणे,खते,किटकनाशके खरेदी करण्यासाठी शेतकऱ्याकडे असलेल्या कापसाची विक्री होणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दि.२१ मे २०२० रोजी राज्यस्तरीय खरीप आढावा बैठकीत दिलेल्या सुचना विचारात घेता, जिल्ह्यातील प्राथमिक नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडील कापुस खरेदी मान्सुनपुर्वी पुर्ण होणे आवश्यक असुन त्यासाठी कापुस खरेदीचा वेग वाढविणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
Leave a comment