बीड | वार्ताहर
जिल्ह्यातून शुक्रवारी पाठवलेल्या 42 पैकी एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्या रुग्णाच्या गाव परिसरातील 3 कि.मी. परिसरातील एकूण सहा गावे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कंटेटमेंट झोन म्हणून घोषित केली आहेत.त्यामुळे ही सर्व गावे आता अनिश्चित काळासाठी बंद राहणार आहेत.
शुक्रवारी पाठवलेल्या स्वॅबमध्ये आष्टी तालुक्यातील धनगरवाडी येथील एका व्यक्तीच्या स्वॅबचा समावेश होता. तो मुबंई येथून गावी परतला होता. त्याचा रिपोर्ट शुक्रवारी रात्री उशिरा पॉझिटिव्ह आता धनगरवाडी परिसरातील गावात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी रात्री आदेश जारी करत धनगरवाडीपासून 3 किलोमीटर परिसरातील धनगरवाडी (पिंपळा), पिंपळा काकडवाडी, नांदूर, खरडगव्हाण व सोलापूरवाडी हा परिसर कंटेटमेंट झोन म्हणून घोषित केला आहे.आता ही सर्व गावे व परिसर पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येवून संचारबंदी लागू करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी यांनी आदेशात नमूद केले आहे.
दरम्यान मुबंई येथून परतलेला हा रुग्ण कोणाच्या संपर्कात आला होता, याची माहिती घेऊन आरोग्य विभाग पुढील उपाययोजना करणार आहे. कंटेटमेंट झोन परिसरात बी प्लॅन तयार करून त्या परिसरातील गावांमध्ये आरोग्य अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांच्या स्वतंत्र टीमकडून घरोघर जाऊन आरोग्य सर्व्हेक्षण करण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे.
Leave a comment