परळी । वार्ताहर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यामध्ये कर्मचार्यांना चेक पोस्ट,आरोग्य पथक, सर्वेक्षण, रेशन दुकानावर तांदूळ वाटप अशा वेगवेगळ्या कर्तव्यावर ड्युटी देण्यात येत आहेत हे कमी म्हणून की काय आता तर पोलीस स्टेशनला बंदोबस्ता साठी शिक्षक कर्मचार्यांची नियुक्त केलेलीे आहे.परळी गट शिक्षणाधिकारी कार्यालयांतर्गत दिलेल्या या नियुक्त्यांमध्ये गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या मर्जीतील शिक्षकांना वगळून काही ठराविकच शिक्षकांना वारंवार ड्युटी देण्यात येत असल्याने शिक्षक कर्मचार्यांमध्ये अतिशय नाराजी दिसून येत आहे.या शिक्षक कर्मचार्यांच्या म्हणण्यानुसार मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष राहूल पोटभरे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी (दि.22) या गोष्टीचा निषेध करण्यासाठी हाताला काळी पट्टी बांधून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले.
सध्याच्या परिस्थितीमध्ये आरोग्य कर्मचारी पोलीस कर्मचारी यांच्या खांद्याला खांदा लावून शिक्षक वर्ग सुद्धा आपले कर्तव्य पार पाडताना दिसून येत आहेत, आरोग्य कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांना 50 लाखाचा आरोग्य विमा शासनाने मंजूर केलेला आहे परंतु शिक्षक वर्ग या आरोग्यविमा पासून आतापर्यंत वंचित ठेवण्यात आलेला आहे.अशीच कर्तव्य बजावत असताना सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील डफळापुर येथील शिक्षक नानासाहेब सदाशिव कोरे यांचे दुर्दैवी निधन झाल, हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. या शिक्षक बांधवाला कुठल्याही प्रकारचे निवृत्तीवेतन नाही असे असताना सुद्धा शिक्षक आपले कर्तव्य बजावत आहेत. कुठल्याही प्रकारच्या सुविधा नसताना प्रशिक्षण नसताना संबंधित शिक्षकांना 42 डिग्री तापमानात जीव धोक्यात घालून बारा बारा तास कर्तव्यावर नमणे चूकीचे आहे. शिक्षक कर्मचार्यांना अनेक ठिकाणी दमदाटी अरेरावीची भाषा शिक्षकांची मानहानी अशी अनेक प्रकरणे चव्हाट्यावर आलेली आहेत तरीसुद्धा परळी गशिअ कार्यालय यांनी आपल्या मर्जीतील शिक्षक यांना वगळून काही विशिष्ट शिक्षकांना वारंवार नियुक्ती दिलेली आहे. या स्थितीत बदल झाला नाही तर याची तक्रार माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात येईल येईल असा इशारा मागासवर्गीय शिक्षक संघटनाच्या वतीने देण्यात आला आहे.
Leave a comment