केज । वार्ताहर
केज-कळंब दरम्यान महामार्गाच्या पुलावर काम करणारे अनेक परप्रांतीय मजूर गेली अनेक महिन्या पासून काम करीत आहेत. काम बंद असल्यामुळे व त्यांच्या ठेकेदारांनी कामाचा पूर्ण मोबदला न दिल्यामुळे उपाशी पोटी हे मजूर पायी जात असताना त्यांच्या गुत्तेदारांनी रस्त्यात अडवून त्यांना धमकविणे सुरू केले. हा प्रकार स्थानिक नागरिकांना समजताच त्या गुत्तेदारांच्या साथीदारांची मस्ती चांगलीच जिरविली.
मांगवडगाव पुल येथे महामार्गाच्या कामावर बिहार आणि आसाम राज्यातील कामगार काम करीत आहेत. लॉकडाउन असल्यामुळे त्यांना काम नाही. त्यामुळे त्यांची उपासमार होत असल्याने त्यांना युसूफवडगाव ठाण्याचे सहाय्यकनिरीक्षक आनंद झोटे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते रमेश भिसे व मनिषाताई घुले, पत्रकार गौतम बचुटे यांनी त्यांच्या संस्थेमार्फत जीवनावश्यक वस्तू देऊन त्यांच्या अन्नपाण्याची व्यवस्था केली आहे. लॉकडाउनच्या पूर्वी त्यांनी बारा-बारा तास काम करूनही केवळ त्यांना आठ तासाचा पगार देऊन त्यांना वेठबिगरासारखे राबवून घेतले जात होते. या सर्व प्रकाराला वैतागून आणि कोरोनाच्या भितीमुळे बिहार राज्यातील वीस मजूर हे आज पायी निघाले होते.त्यांनी वैद्यकीय तपासणी आणि पोलीस ठाण्यात व तहसील कार्यालयात त्यांच्या गावी जाण्याची नाव नोंदणी देखील करून घेतली आहे. त्यांचा हा डोक्यावर सामान घेऊन पायी जाणार जथ्था रमेश भिसे यांनी त्यांच्या जनविकास सामाजिक संस्थेजवळ अडवून त्यांना जेवण दिले. तसेच पत्रकार गौतम बचुटे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी गायकवाड तहसीलदार मेंढके, सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद झोटे यांना माहिती दिली. त्यावेळी गुत्तेदार रेड्डी यांचे साथीदार तीन कर्मचारी आले. त्यांनी या मजुरांना धमकी देऊन शिवीगाळ सुरू केली. हा प्रकार लक्षात येताच रमेश भिसे आणि पत्रकार गौतम बचुटे यांनी तहसीलदार व पोलीस अधिकार्यांना फोनवरून माहिती दिली. तोपर्यंत रस्त्याने जाणारे नागरिक जमा झाले. त्यांनी त्या तिघांची खरडपट्टी काढून पिटाई केली. त्नंतर पोलीस येताच त्यांना घेऊन ते पोलीस ठाण्यात गेले. या प्रकारामुळे संकटात सापडलेल्या मजुरांना धमकाविणे गुत्तेदाराला चांगलेच भोवले. याबाबत रमेश भिसे म्हणाले, कुणाही मजुरांवर जर अन्याय होत असेल तर तो आम्ही सहन करणार नाही. प्रसंगी न्यायालतात जाऊन मजुरांची दाद मागू आणि त्यांना न्याय मिळवून देऊ.
मेल कंपनीने लक्ष दिलेच नाही
आमच्याकडून या मेल कंपनीने बारा बारा तास काम करून घेतले आणि रोजगार मात्र आठ तासाप्रमाणे दिला आहे. तसेच आमची उपासमार होत असताना देखील लक्ष दिले नाही. मागील दीड महिन्यापासून आम्हाला सामाजिक संस्था मदत करीत आहेत अशी प्रतिक्रिया बिहारमधील मजूर अलोक कुमार वर्मा यांनी मांडली. तर मेल कंपनीचे कनिष्ठ अभियंता विकास रेड्डी म्हणाले, हे मजूर ज्या पोट गुत्तेदाराकडे काम करीत आहेत त्यांना आम्ही बिल अदा केले आहे. परंतु त्या पोट गुत्तेदारांनी या मजुरांची फसवणूक केली असावी.
----------
Leave a comment