परळी । वार्ताहर
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गेल्या 60 दिवसांपासून लोकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे. या कालावधीत लोकांची गर्दी होण्यास कारणीभूत ठरत असलेल्या सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश आहेत. तंबाकू आणि तंबाखूजन्य तसेच दारूविक्रीवर कडक बंदी आहे. बंदच्या काळात गावठी दारू पिणार्यांचे प्रमाण वाढल्याने पोलिसांची आणि ग्रामस्थांची डोकेदुखी वाढली आहे. याच कारणास्तव शुक्रवारी (दि.22) तालुक्यातील मौजे पिंपरी बु. येथे सरपंच आणि उपसरपंच यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या दक्षता समितीच्या वतीने गावठी दारूचे अड्डे उध्वस्थ करण्यात आले.
लॉकडाऊनदरम्यान छुप्या पद्धतीने गावठी दारू काढण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे भांडणांची अनेक प्रकरणे तर समोर येतातच पण याचा नागरिकांच्या आरोग्यावरही विघातक परिणाम होत आहे. पिंपरी बु. येथे सरपंच सौ.शामल माणिकराव पौळ व उपसरपंच सुरेश माने यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या दक्षता समितीने गाव शिवारातील गावठी दारूचे अड्डे उध्वस्त केले. गावकर्यांनी राबविलेल्या या अभियानामुळे हजारो लिटर रसायन नष्ट होऊ शकले आहे. लोकडाऊनमुळे व्यस्त असलेल्या पोलिसांनाही या दक्षता समितीमुळे मोठी मदत आणि सहकार्य होत आहे. पिंपरीत स्थापन करण्यात आलेल्या दक्षता समितीचे सदस्य बिबीशन जाधव, रंजित काळे, रुस्तुम माने, हनुमान पौळ, योगीनंद शिंदे, राजेभाऊ कोल्हे, उद्धव काळे, मुंजाभाऊ कोल्हे, विलास शिंगणे, आबासाहेब काळे, आबासाहेब आवटे, रफिक शेख, आनंद काळे यांच्यासह सर्व सदस्यांनी सरपंच आणि उपसरपंचांच्या नेतृत्वात दारू अड्डे उध्वस्त करण्याची मोहीम यशस्वीपणे राबवली
Leave a comment