किल्लेधारूर । वार्ताहर
एक महिन्यापुर्वी शासनाच्या विविध अनुदान योजनांची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेल्या आहेत. मात्र येथील पोस्ट कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेचे 741 लाभार्थी लाभापासुन अद्यापही वंचित आहेत.
कोविड 19 च्या संकटामुळे देशभर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. याकाळात सर्वसामान्य विविध निराधार योजनेतील लाभार्थ्यांना केंद्र व राज्य सरकारने तीन महिन्याचे एकत्रित अनुदान त्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचा निर्णय घेतला होता. या अनुशंगाने येथील तहसील प्रशासनाने तात्काळ एप्रिल महिन्यात संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजना व श्रावणाबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना संबंधित बँक व पोस्ट कार्यालयाकडे रक्कम वर्ग केली. यापैकी भारतीय स्टेट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक आदी बँकेच्या अनुदान रक्कमा आठ दिवसात थेट लाभार्थ्यांच्या हातात मिळाल्या. पोस्ट कार्यालयाच्या रक्कमा अद्यापही वाटप सुरुच आहेत. पोस्टाकडे असलेल्या संजय गांधी निराधार योजनेच्या 741 लाभार्थ्यांचा धनादेश परत गेल्यामुळे आजपर्यंत हे लाभार्थी वंचित आहेत. दि.30 एप्रिल रोजी तहसील प्रशासनाने संजय गांधी योजनेच्या धनादेश दुरुस्ती करुन रु. सदोतिस लाख दोन हजार दोन शे वीस रुपयांचा धनादेश जमा केला आहे. याबाबतीत पोस्ट मास्टर कोंगलवार यांच्याशी संपर्क केला असता येत्या दोन दिवसात खात्यावर रक्कम जमा होवून लाभार्थ्यांना वाटप करण्यात येईल अशी माहिती दिली. मात्र तालुक्यातील बहुतेक लाभार्थ्यांना अनुदान मिळाले असताना पोस्टाच्या दप्तर दिरंगाईने 741 लाभार्थी अद्यापही लाभा पासुन वंचित आहेत.
Leave a comment