बीड । वार्ताहर
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाउनमुळे मार्चपासून आगारात उभी असणारी लालपरी जवळपास दोन महिन्यानंतर रस्त्यावर धावण्यासाठी आज शुक्रवारपासून सज्ज झाली. कोरोनाचे संकट लक्षात घेवून प्रवाशांनी मात्र घरी राहणेच पसंत केल्याचे चित्र आज बीड आगारात पहावयास मिळाले.
आजपासून दररोज सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत प्रत्येक आगारातून बस फेर्या होणार आहेत. मात्र बसस्थानकात एसटीचे कर्मचारी वगळता सकाळच्या सत्रात प्रवाशी दिसून आले नाहीत.दुपारी 2 वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्व आगारातून 70 फेर्यांचे नियोजन केले होते. मात्र ते साध्य होवू शकले नाही. सुत्रांच्या माहितीनुसार धारुर आगारातून 6 तर परळी आगारातून 1 अशा एकूण 7 फेर्या झाल्या.
राज्य शासनाच्या आदेशानुसार नॉन रेड जिल्ह्यात एसटी महामंडळाची सेवा आजपासून (दि.22) सुरू झाली. बसच्या एकूण आसन क्षमतेच्या 50 टक्के म्हणजेच 22 प्रवासी महामंडळाच्या बसमधून प्रवास करू शकणार आहेत. आजपासून सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत बीड- परळी, बीड-अंबाजोगाई, बीड- माजलगाव, बीड- धारूर, बीड- गेवराई, बीड- पाटोदा, बीड- आष्टी, परळी-अंबाजोगाई, धारूर-अंबाजोगाई, केज-माजलगाव, माजलगाव-गेवराई-गढी या सर्व मार्गावरुन बस फेर्या सुरु करण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे सुुरुवातीला कमी प्रतिसाद मिळेल पण लालपरी सातत्याने रस्त्यावर धावताना दिसली की, हळूहळू लोकांची मानसिकता बदलेल आणि स्थिती पूर्ववत होण्यास नक्की मदत होईल असा विश्वास अधिकार्यांनी व्यक्त केला.
Leave a comment