परली \ प्रतिनिधि
बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक गावांना कंटेन्मेंट म्हणून घोषित करण्यात आलेले असून पोलीस बंदोबस्त लावण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडत आहे. हे पाहता पोलिसांना मदतीसाठी शिक्षक द्यावेत अशी मागणी करण्यात आली होती. जिल्हा परिषदेने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत काही शिक्षकांना पोलीस ठाण्यात हजर होण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबत नवे आदेश काढण्यात आले असून, परळी तालुक्यातील परळी शहर, ग्रामीण आणि सिरसाळा पोलीस ठाण्यात एकूण 23 शिक्षकांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत.
कोरोना महामारीचा प्रसार रोखण्यासाठी गेल्या 60 दिवसांपासून देशात आणि राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या दोन महिन्यांत परिस्थिती नियंत्रणात आणतांना पोलीस यंत्रणेवर खूप मोठा कामाचा ताण पडत आहे. बीड जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात जिल्हा प्रशासनाला आजपर्यंत यश आले होते. गेल्या काही दिवसांपासून मात्र कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. जिल्ह्यातील 8 तालुक्यातील अनेक गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केला असल्याने तेथे मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त लागणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्याच्या सीमेवरील चेकपोस्टवरसुद्धा पोलीस कर्मचारी कमी पडत आहेत. या पार्श्वभूमीवर आता शिक्षकांची मदत घेतली जात आहे. ऊसतोड मजूर जिल्ह्यात परतत असतांनासुद्धा यापूर्वी शिक्षकांना चेकपोस्टवर नियुक्त्या देण्यात आल्या होत्या. आता परत एकदा शिक्षकांच्या नियुक्त्या पोलीस ठाण्यात करण्यात आल्या आहेत. त्यांच्या या नियुक्त्यांचे आदेश जिल्हा परिषदेकडून निर्गमित करण्यात आले असून, आज दि.22 मे पासूनच पोलीस ठाण्यात हजार राहावे असे सांगण्यात आले आहे.
3 ठाण्यात 23 शिक्षक
परळी तालुक्यातील पोलिसांना इतर महत्वाच्या ठिकाणी बंदोबस्तासाठी न्यावे लागत असल्याने येथे उर्वरित पोलिसांच्या मदतीला शिक्षकांना नियुक्त करण्यात आले आहे. परळी शहर पोलीस ठाण्यात 5, परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात 10 तर सिरसाळा पोलीस ठाण्यात 8 शिक्षक आपली सेवा आजपासून बजावणार आहेत
Leave a comment