बीड: इंडियन कौन्सील ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात आयसीएमआरच्या तज्ञ डॉक्टरांचे एक पथक आज शुक्रवारी (दि.22) बीड जिल्ह्यात दाखल झाले आहे. या पथकामध्ये चार तज्ञ डॉक्टर असून जिल्ह्यातील 10 डॉक्टरांची टीम त्यांच्यासोबत आहे. जिल्ह्यातील दहा गावात जावून नागरिकांचे रक्त नमुने तपासणीसाठी घेवून पाहणी केली जाणार असून बीड शहरात या पथकाने आरोग्य सर्व्हेक्षण केले.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी ही माहिती दिली.
आयसीएमआरचे पथक जिल्ह्याचा दौरा करणार असल्याचे यापूर्वीच निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार आता आज शुक्रवारी इंडियन कौन्सील ऑफ मेडिकल रिसर्चच्या तज्ञ डॉक्टरांचे हे पथक जिल्ह्यात दाखल झाले आहे.या पथकामध्ये आयसीएमआर संस्थेच्या पुणे शाखेतील डॉ. ऋषिकेश आंधळकर यांच्यासह अन्य तिघांचा समावेश आहे. पथकासमवेत बीड जिल्ह्यातील डॉ. क्षीरसागर, डॉ. के.के. खाडे, डॉ. बन्सोडे, डॉ. तेजस थोरात, डॉ. डी.बी.चव्हाण, डॉ. एस.व्ही. केकाण, डॉ.जाधव, डॉ. आर.एस.हडवे, डॉ. नवसीन फातेमा, डॉ. आसमा सय्यद या वैद्यकीय अधिकार्यांसह दहा एएनएम व आठ एमपीडब्ल्यू तसेच आठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि सहाय्यकांचा सहभाग आहे.
तज्ञ डॉक्टरांची टीम बीड, परळी शहरासह हिंगणी (ता.आष्टी), तेलगाव (ता.माजलगाव), चंदन सावरगाव (ता.केज) नांदगाव (ता.अंबाजोगाई), आम्ला (ता.गेवराई), पांगरी (ता.शिरुरकासार), पिंपळनेर (ता.बीड) तसेच मोहा (ता.परळी) या 10 ठिकाणी सर्व्हेक्षण करत 40 जणांचे रक्तनमुने तपासणीला घेवून तेथेच त्यांची तपासणी केली जाणार आहे.
Leave a comment