विजयसिंह पंडित यांचा सवाल
गेवराई । वार्ताहर
कोरोनाच्या महामारी मध्ये सर्वसामान्य लोकांच्या हक्काचे रेशनवरील धान्याचा भाजपा कार्यकर्त्याकडून घोटाळा झाल्याचे उघड झाले, त्याची साखळी तोडण्याची भीष्म प्रतिज्ञा आपण सोईस्कर विसरलात, रेशन घोटाळ्याच्या सखोल चौकशी साठी तुम्ही आंदोलन कराल असे वाटले होते, मात्र उपोषणाची नौटंकी तर रेशन घोटाळ्यातून लक्ष विचलीत करण्यासाठी आहे का? असा प्रश्न सामान्य माणसाला पडल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केले. राज्य सरकारच्या विरोधात उपोषण करणार्या आ. पवार यांच्या आंदोलनाचा त्यांनी खरपूस समाचार घेतला.
आ.लक्ष्मण पवार यांच्या उपोषणाबाबत गेवराई राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी समाजमाध्यमातून चांगलीच खिल्ली उडवली. याबाबत बोलतांना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित म्हणाले, र्केद्र सरकारच्या माध्यमातून सीसीआय कडून तालुक्यात कापूस खरेदी सुरू आहे. खरेदी केंद्राच्या क्षमतेनुसार खरेदी करा असे आदेश राज्य सरकारने दिलेले असतांना ग्रेडर त्याची अंमलबजावणी करत नाही. आमदार महोदयांनी केंद्रातील भाजपा सरकारकडे आपला शब्द खर्च करून सीसीआय चे खरेदी केंद्र वाढवले पाहिजे होते. खाजगी बाजार समितीच्या माध्यमातून धान्य खरेदी करायला पाहिजे होती हे सर्व सोडून केवळ राजकारण करत उपोषण सुरू केले आहे. कोरोनाच्या महामारी मध्ये सर्वांनी एकत्र येऊन संकटाला तोंड देणे आवश्यक असतांना संकटात सापडलेल्या लोकांना मदत न करता केवळ स्वतःचे पाप झाकून ठेवण्यासाठी आंदोलनाचा खटाटोप असल्याची टीका त्यांनी केली.
विजयसिंह पंडित म्हणाले, भाजप कार्यकर्त्याने केलेल्या राशन घोटाळ्यामुळे तालुक्याची राज्यभरात बदनामी झाली आहे. तालुक्यात राशन माफियांनी धुमाकूळ घातला आहे. वाळू तस्करांनी उच्छांद मांडला आहे. त्यातच बोगस कामे करणार्या गुत्तेदारांमुळे पांढरवाडी सारख्या अनेक डांबरी रस्त्यांची वर्षाच्या आत वाट लागली आहे. अनेक गावांमध्ये पाणी टंचाई असताना पंचायत समितीच्या वतीने किती गावात टँकर सुरू झाले? मजुरांच्या हाताला काम नाही अशा परिस्थितीत पंचायत समितीच्या वतीने रोहयोची किती कामे सुरू झालीत?, शहरात जुन्या रस्त्यांवर एक लेयर टाकून थातुर मातुर कामे सुरू आहेत. शहरातील अनेक भागांमध्ये पाणी नाही, तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, राष्ट्रीयकृत बँका, शासकीय कार्यालये दलालांच्या विळख्यात आहेत. निराधारांना आधाराची, बेरोजगारांना रोजगाराची गरज आहे. अशा अनेक संकटांना लोक तोंड देत आहेत. कोरोना संकटात आमदार म्हणून तुम्ही सामान्य लोकांसाठी काय केले, कोणती मदत केली हे सुद्धा उपोषण करण्यापूर्वी सांगितले पाहिजे असेही विजयसिंह पंडित म्हणाले.
Leave a comment