औताच्या रूमण्यावर हात ठेऊन शेतकर्यांची उन्हाळ खरड्याला सुरूवात
आष्टी । वार्ताहर
पुढील पंधरा दिवसानंतर खरीप हंगामाला होत असून त्यासाठी शेतकर्यांनी शेतीतील कामांना वेग दिला आहे. पाऊस पडल्यानंतर जमीन पेरणीस योग्य हवी यासाठी शेतकरी शेतात मोगडा पाळीचे काम करत आहे. यावर्षी चांगला पाऊस पडून शेती चांगली पिकवावी अशीच प्रार्थना बळीराजा वरूण राजाकडे करत आहे.
मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतरच खर्या अर्थाने आपल्याकडे खरीप हंगामातील पेरण्यांना सुरुवात होते. रोहिणी नक्षत्र संपल्यानंतर मृग नक्षत्र लागते. या नक्षत्रात पाऊस पडल्याबरोबर शेतकरी तिफणीच्या चाढ्यावर मुठ धरुन काळ्या आईच्या उदरात केलेल्या कष्टाचे फळ मिळेल या अशेने बी रूजवतो. शेतकर्यांना चाढ्यावर मुठ धरण्याची वेळ येईपर्यंत उन्हाळाभर शेतात अनेक मशागती कराव्या लागतात. रब्बी हंगाम संपल्यानंतर उन्हाळ्यात नांगरणी, शेन खत टाकणे बरोबरच नांगरणीत निघालेले ढेखळे फोडण्यासाठी उन्हाळ खरडा द्यावा लागतो. काही ठिकाणी थोड्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे ढेखळेही चांगली फुटत आहेत. काही दिवसांवर मृग नक्षत्र येऊन ठेपले आहे. पाऊस देखील योग्य वेळी पडण्याची शेतकर्यांना आशा निर्माण झालेली आहे. मृग नक्षत्रापुर्वी आपली जमिन पेरणी योग्य व्हावी यासाठी शेतकरी लगबगीने मशागतीच्या कामास लागला आहे.
यावर्षी चांगला पाऊस पडण्याची अपेक्षा
गेल्या वर्षी राज्यात चांगल्या प्रमाणात पाऊस झाला होता. असे असतांनाही आष्टी तालुक्यावर वरूनराजा ची वक्रदृष्टी राहिली होती. त्यामुळे यावर्षी तालुक्यात चांगला पाऊस पडून पिक-पाणी चांगले यावे अशी शेतकर्यांची अपेक्षा आहे.
कोरोणाचा परिणाम होण्याची शक्यता
शहराकडून लोक गावाकडे येत आहेत. येतांना ते सोबत कोरोना चा संसर्ग घेऊन येण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर ग्रामिण भागात कोरोनाची साथ सुरू झाली तर याचा फटका खरीप पेरणीला बसण्याची शक्यता आहे. कारण ग्रामीण भागात हा रोग आलेला कळला तर याच्या दहशतीने मजुर मिळणार नाहीत. आणि शेती व्यवसायावर संकट येईल.
Leave a comment