दोन तास महामार्ग ठप्प; क्लिनरवर उपचार सुरु
बीड । वार्ताहर
विशाखापट्टणम् येथून गुजरात राज्यात ज्वलनशील रसायन घेऊन निघालेले टँकर शहराजवळील मांजरसुंबा घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटले. त्यानंतर रसायनाने पेट घेतला आणि काही वेळातच मोठा स्फोटझाला. त्यामुळे संपूर्ण घाट हादरुन गेला. या दुर्घटनेत टँकरचालकाचा होरपळून मृत्यू झाला तर क्लिनर गंभीररीत्या जखमी झाला. पोलीस व अग्निशामक दलाच्या दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आली. बुधवारी (दि.20) सकाळी 9 वाजता ही घटना घडली.
रसायन घेऊन टँकर (क्र.जीजे 16 एव्ही -6177) जात होता. टँकर मांजरसुंबा घाटात येताच अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे तो उलटला. रसायन असल्यामुळे टँकरने तात्काळ पेट घेतला.यावेळी मोठी आग लागली. काही क्षणातच आगीने संपूर्ण परिसर कवेत घेतला. त्यानंतर धुराचे लोळ बाहेर पडू लागले. काही वेळातच मोठा स्फोट झाला. आग इतक्या वेगाने पसरत गेली की चालकास बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही. त्याचा अक्षरश: होरपळून मृत्यू झाला. सत्तेकुमार (28, रा. उन्नवाल, खलीलाबाद संत कबीर नगर, उत्तरप्रदेश) असे मृत चालकाचे नाव आहे. करण विनोदप्रसाद गौतम (18,रा. बनारस,उत्तरप्रदेश) हा क्लिनर जखमी असून त्यास तातडीने रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असल्याचे सहायक निरीक्षक सुजित बडे यांनी सांगितले.दरम्यान अपघातानंतर बीड ग्रामीण पोलीस, अग्निशामक दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी आग नियंत्रणात आणली. आगीमुळे दोन्ही बाजूला वाहतूक रोखून धरली होती. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील वाहने अडकून पडली होती. दोन तास महामार्ग ठप्प झाला होता. आग नियंत्रणात आल्यानंतर महामार्ग वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला.
Leave a comment