बीड । वार्ताहर
राज्यात कोरोना महामारीवर प्रभावी उपाय योजना आणि प्रशासकीय नियंत्रण ठेवण्यात महाराष्ट्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. संपूर्ण राज्यात आरोग्य अराजक पसरले आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा जबरदस्त विळखा आवळला जात आहे. कोरोनाच्या विषाणूनेअकार्यक्षम व सुस्त सरकारी यंत्रणेला पोखरून काढले. सरकार आणि प्रशासन यंत्रणेमध्ये समन्वयाचा अभाव आहे. परिणामी कोरोना महामारी चा प्रादुर्भाव शहरी भागासह ग्रामीण भागातही झपाट्याने वाढला. रुग्ण संख्येबरोबरच मृत्यूचे प्रमाणही लक्षणीय वाढले . आज कोरोना संकटाची तीव्रता देशाच्या तुलनेत महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर आहे. राज्यातील जनतेच्या जीवासी खेळणार्या सरकारला जाब विचारण्यासाठी 22 मे रोजी संपूर्ण राज्यामध्ये प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाराष्ट्र बचाव आंदोलन आयोजित केले आहे. या आंदोलनात बीड जिल्ह्यातील सर्व भाजपा कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टेंशिंगचे पालन करत आपले कुटुंब व मित्रांसह आपल्या घराच्या अंगणात, छतावर येऊन महाराष्ट्र बचाव आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केले आहे.
भारतीय जनता पार्टी राष्ट्र प्रथम या आपल्या पक्षनिती प्रमाणे आज पर्यंत भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता जनसेवा करत आहे. आणीबाणीच्या काळात सत्ताधारी आणि विरोधक यांनी समान पातळीवर येऊन काम करणे अपेक्षित होते.पण दुर्दैवाने सरकारला दिखावा करायचा आहे काम नाही. हे राज्यातील जनतेचे दुर्भाग्य. म्हणूनच महाराष्ट्रातील जनतेला मृत्यूशय्येवर नेणार्या सरकारला आता जाब विचारण्यासाठी 22 मे शुक्रवार रोजी सकाळी 11 वाजता भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या घराच्या अंगणात कुटुंब व मित्र मंडळींना बरोबर घेऊन हातामध्ये राज्य सरकारच्या अपयशाचे फलक घेऊन, काळे कपडे घालून,तोंडाला काळे मास्क लावून उभे रहावे. अंगण हेच रणांगण असे या निषेधाचे स्वरूप आहे. जिल्ह्यातील सर्व भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच,पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी महाराष्ट्राच्या हितासाठीआंदोलनात सहभागी व्हावे. सुरक्षित अंतर ठेवून हे आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन राजेंद्र मस्के यांनी केले आहे
Leave a comment