माजलगाव । वार्ताहर
कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी मागील दोन महिन्यांच्या कालावधीपासून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून माजलगांव उपविभागातील नागरिक लॉकडाऊनचे नियमांचे काटेकोरपणे पालन करत आहेत. याचीच फलनिष्पत्ती म्हणून माजलगांव उपविभागामध्ये बाधित रुग्ण सापडलेला नव्हता. परंतू आता परजिल्हयात अडकलेल्या मजूर,यात्रेकरू,यांचेसह ईतर नागरिक यांच्या सोयीसाठी शासनाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार अशा अडचणीत सापडलेल्या व्यक्तींना आरोग्य तपासणीसह काही अटींवर आपल्या जिल्हयामध्ये स्वत:चे गावी येण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे असे असतानाही विनापरवानगी तसेच गुप्या मार्गाने बाहेर जिल्हा,बाहेरगावाहून स्वत:च्या मुळ गावी परत येऊन लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करत आहेत. अशावेळी नागरिकांनी त्यांच्यापासून दूर राहून काळजी घ्यावी असे आवाहन उपविभागीय अधिकारी शोभा ठाकूर यांनी केले आहे.
माजलगाव उपविभागातील माजलगाव,धारूर,वडवणी या तिन्ही तालुक्यातील ग्राम दक्षता समित्यांनी अत्यंत दक्ष राहणे गरजेचे आहे. बाधित भागातून तसेच परजिल्हयातून विनापरवानगी आलेले तसेच परवानगी घेऊन आलेले मात्र वारंटाईन नियमांचा भंग करुन गावात,शहरात इतर फिरणारे इसमांबाबत नागरिकांनी तत्काळ प्रशासनास, ग्रामदक्षता समिती,ग्राम सुरक्षा दल, ग्रामसेवक,तलाठी,मंडळाधिकारी, सरपंच , पोलिस पाटील,आरोग्य कर्मचारी,आशा स्वयंसेविका यांना देण्याचे आवाहन श्रीमती शोभा ठाकूर, उपविभागीय अधिकारी माजलगांव यांनी केले आहे.तसेच ग्राम दक्षता समिती व ग्राम सुरक्षा दल यांनी गावात राहून कोण कोण व्यक्ती गावात आलेल्या आहेत याबाबत सतर्क रहावे. तसेच गांव पातळीवर स्थानिक लोकांनी आपल्या गावात पुणे-मुंबई येथिल लोकांना घरामध्ये थेट प्रवेश न देता त्यांना वारंटाईन करणेसाठी आशा स्वयंसेविका,अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक यांना त्वरित कळवावे.नागरिकांनी घाबरुन न जाता दक्ष रहावे. तसेच संयम ठेवावा,अतितातडीच्या कामाव्यतिरीक्त घराबाहेर पडू नये.आपले हात वारंवार सावणाने-हँडवॉशने स्वच्छ धुवा.आपला हात वारंवार नाक,तोंड यांना लागणार नाही याची काळजी घ्या . खोकला अथवा शिंकताना तोंडावर रुमाल धरा.खोकला किंवा सर्दी झालेल्या व्यक्तींपासून दूर रहा. चुकीचे संदेश पसरवू नका. चुकीचे संदेश मिडीयावर प्रसारित केल्यास अथवा परजिल्हयातून आलेल्या व्यक्तींची माहिती लपविल्यास वा अशा आलेल्या व्यक्तींचा सहकार्य केल्यास आपल्याविरुद्ध कायदेशिर कार्यवाही होऊ शकते.याची सर्वांनी नोंद घेण्याचा इशाराही श्रीमती शोभा ठाकूर यांनी नागरिकांना दिला आहे.
Leave a comment