वडवणी । वार्ताहर
सध्या सर्वत्र कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. हा कोरोना दिवसेंदिवस वाढतच चालला असून सर्वसामान्यांच्या मदतीला कोणीही भितीपोटी धावून जात नाहीये.बीड जिल्ह्यातील जवळपास सर्व राजकारणी रस्त्यावर दिसणे दुरापास्त झालेले असताना केवळ जनतेच्या हितासाठी व काळजीपोटी आ.सुरेश धस हे कोरोना योध्दा म्हणून रात्रंदिवस पूर्णवेळ प्रशासनाच्या सर्व नियम व अटींचे पालन करीत जनसेवेचे काम करीत आहेत. मात्र कोणत्याही गोष्टीत राजकारण करणार्या या सरकारने आ.धस यांच्याविरुद्ध सुडाचे राजकारण चालविले असून या नाकर्त्या सरकारने तात्काळ हे सुडाचे राजकारण थांबवून आमदार सुरेश धस यांच्यावरील दाखल गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत अशी मागणी वडवणी येथील युवा नेते भारत जगताप यांनी केली आहे.
सध्या सुरू असलेल्या कोरोना प्रादूर्भावाच्या महामारीच्या परिस्थितीत व लॉकडाऊनच्या काळात जनसामान्यांमध्ये जनजागृती करत प्रशासनाला सहकार्याची भूमिका घेत बीड-लातूर-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेचे आ. सुरेश धस यांचे समाजविधायक जनकार्य सुरु आहे. यामध्ये आष्टी-पाटोदा-शिरूर विधानसभा मतदारसंघात या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आजवर जवळपास दीड लाख मास्कचे नागरीकांना वाटप केले आहे तसेच कोणत्याही ऊसतोड मजुरांसाठी त्यांच्या अडीअडचणींसाठी रात्री अपरात्री ते थेट धावून जात आहेत. त्या गोरगरिबांना त्यांच्या जेवणाची खाण्यापिण्याची व्यवस्था केली आहे. तरी आ.धस यांच्यावरील प्रशासनाने दाखल केलेले दोन्ही गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत अशी मागणी आपण स्वतः राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, तसेच जिल्हाधिकारी बीड व पोलिस अधिक्षक बीड यांना ई-मेलव्दारे निवेदन देऊन करणार असल्याची माहिती वडवणी येथील भारत जगताप यांनी यावेळी दिली.
Leave a comment