गरजुंना अन्न तर अडकलेल्या विद्यार्थ्यांनाही मदत
बीड । वार्ताहर
लॉकडाऊनमुळे पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांचे व इतर गरजु लोकांचे हाल सुरू होते. विद्यार्थ्यांच्या खानावळी बंद असल्याने त्यांच्या जेवणाचा प्रश्नही निर्माण झाला होता. अशा वेळी चौसाळा (ता.बीड) येथील एजाज शेख हा तरूण पुढे आला. एमपीएससी स्टुडंट्स राईट्सचे महेश बडे आणि किरण निंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक व्यापक उपकरण हाती घेत चौसाळ्याच्या तरूणाने मोठा पुढाकार घेतला. गरजुंना घरपोहोच अन्न तर अडकलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या-त्यांच्या गावी जाण्यासाठी प्रशासकीय नियमानुसार प्रयत्न केले.
बीड जिल्ह्यातील चौसाळा येथील एजाज शेख या तरूणाच्या उपक्रमास सर्वांचा हातभार लागला. स्वत:च्या जिवाची काळजी न करता या तरूणाने कोणत्याही विद्यार्थ्याला उपाशीपोटी राहु दिले नाही. लॉकडाऊन आणि कोरोनामुळे प्रत्येकाला आपल्या गावाकडे जाण्याची ओढ लागलेली असतांना एजाज पुण्यामध्ये असुन मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी जिव तोडुन मेहनत करतोय. गावी जाणार्या विद्यार्थ्यांसाठी पासेस उपलब्ध करून देणे, स्थानिक प्रशासनासह ज्याठिकाणी ते जाणार आहेत तेथील अधिकार्यांशी बोलणे, त्यांच्यासाठी गाड्यांची व्यवस्था करणे या कामाबरोबरच पुण्यात ठिकठिकाणी घरात राहुन अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांना घरपोहोच जेवण पुरविण्यातही तो पुढे आहे. या उपक्रमास जेवण बनवण्यासाठी हॉटेल अभिरूची चे मालक रविंद्र बारसकर यांनी आपले हॉटेल निशुल्क उपलब्ध करून दिले आहे. युनिक ऍकॅडमीचे प्राध्यापक अमोल वानखेडे यांचेही आर्थिकदृष्ट्या हातभार या उपक्रमास लागत आहेत. एजाज शेख याच्यासह इतरांच्या टिमने नियोजनाचे आणि सामाजिक बांधीलकीचे एक उत्कृष्ट उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे. विद्यार्थ्यांच्या घरी मोफत जेवण पोहोचवण्याचा मिशन हॅप्पी हा उपक्रम खरोखरच शाबासकीचा विषय ठरू लागला आहे.
चौसाळाकरांची मदतही ठरतेय लाख मोलाची
बीड तालुक्यातील चौसाळा येथील एजाज शेख हा तरूण पुण्यात राहुन मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसह इतरांनाही मदत करतोय. इतर टिमच्या सहकार्याने हे सर्व शक्य होत असुन त्यामध्ये चौसाळाकरांची ही मदत लाख मोलाची ठरत आहे. चौसाळ्यातुन अनेकजण या ग्रुपला आर्थिक मदत करत आहेत. एजाजने घेतलेला पुढाकार इतरांसाठी प्रेरणादायी आहे.
Leave a comment