अंबाजोगाई | वार्ताहर
शहरातील संत भगवानबाबा चौकातील ओम पेट्रोल पंपावर आज दुपारी बारा वाजणेच्या दरम्यान झालेल्या विचित्र अपघातात एका सेवानिवृत्त मुख्याध्यापकाचा मृत्यू झाला.
या बाबतची अधिक माहीती अशी की,संत भगवान बाबा चौकानजीक नवीन शेपवाडी वसाहतीत राहणारे सेवानिवृत्त मुख्याध्यापक गोवर्धन मुंडे हे लाॅकडाऊन शिथील कालावधीत स्कुटी घेवून भाजीपाला व इतर साहित्य खरेदीसाठी बाहेर पडले होते.भाजीपाला घेवून परतत असताना ते पेट्रोल भरण्यासाठी चौकातील ओम पेट्रोल पंपावर जात असताना स्कुटीच्या हँडलला लटकवलेली पिशवी हँडलमध्ये अडकली आणि त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटून ती पंपावर उभ्या आसलेल्या खाजगी ट्रँव्हल्सवर आदळली.या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला आणि क्षणार्धात ते रक्ताच्या थारोळ्यात पडले.पंपावर उपस्थितांनी लगेचच धाव घेवून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला.मात्र उपयोग झाला नाही.या अपघातात ब्रेन हॅमरेजमुळे त्यांचे जागीच निधन झाले.या अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सिध्दार्थ गाडे,पो.हे.काॅ. कुलकर्णी व इतरांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला व प्रेत नातेवाईकांच्या हवाली केले.
मयत गोवर्धन मुंडे हे धारूर तालुक्यातील गोपाळपुर येथील रहिवासी असून टोकवाडी येथील रत्नेश्वर विद्यालयातुन मुख्याध्यापक पदावरुन सेवानिवृत्त झाले होते.बीड जिल्हा ग्रंथालय संघाचे ते पदाधिकारी होते.त्यांच्या अकाली निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Leave a comment