केज | वार्ताहर
मंगळवारी पाठविण्यात आलेल्या स्वॅबच्या अहवालानंतर केज तालुक्यातील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. चंदनसावरगाव आणि केळगाव या दोन्ही गावातील प्रत्येकी एकजण कोरोनाबाधित झाला आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने या दोन्ही गावांपासून सात किलोमीटरच्या परिसरातील एकूण २७ गावे अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहेत.
चंदन सावरगाव पासून तीन किमी परिसरात कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. यात चंदनसावरगाव, भाटुंबा, केकतसारणी, कुंबेफळ, बनकारंजा या गावांचा समावेश होतो. तर त्यापुढील चार किमीच्या परिसरात बफर झोन जाहीर करण्यात आला असून त्यात आनंदगाव सारणी, सारणी आनंदगाव, जवळबन, ढाकेफळ, जानेगाव, होळ, कळंबआंबा, मानेवाडी आणि उंदरी या गावांचा समावेश आहे. ही सर्व १४ गावे अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येऊन संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
तसेच, केळगाव पासून तीन किमीच्या कंटेनमेंट झोनमध्ये येणाऱ्या केळगाव, बेलगाव, अरणगाव, सांगवी आणि त्यापुढील चार किमीच्या बफर झोन मध्ये समाविष्ट असलेल्या हनुमंत पिंप्री, माळेवाडी, एकुरका, मस्साजोग, जाधवजवळा, काळेगाव घाट, सारणी, पिंपळगाव आणि कोरेगाव ही सर्व १३ गावे अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येऊन संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
Leave a comment