आष्टी । वार्ताहर
सर्व देशांमध्ये कोरोना विषाणू बाधीत रुग्णांची संख्या,मृत्यूची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे जनतेची दयनीय अवस्था झाली आहे. या मोठ्या संकटावेळी महाआघाडी सरकार राजकारण करण्यात मग्न असल्याने महाराष्ट्र राज्यातील जनता अडचणीत सापडली आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने सर्व सामान्य लोकांकरीता आर्थिक पॅकेज घोषित करावे अशी मागणी भाजपनेते माजी आ.भीमराव धोंडे यांनी केली आहे.
भारतीय जनता पार्टीच्यावतीने महाराष्ट्र बचाव आंदोलनांतर्गत आष्टीचे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,राज्यात सत्ताधार्यांचे अस्तित्व जाणवत नाही.कोविड 19 विरोधात केंद्र शासनाने आखून दिलेल्या गाईड लाईन्सनुसार पुढील पाऊल उचलण्यामध्ये सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. मुख्यमंत्री असलेले राज्याचे प्रमुख घरात बसून आहेत. जनतेला रोजच्या अन्नाची भ्रांत झालेली असताना शासनातील अधिकारी घोटाळेबाजांना मदत करत आहेत आणि या अधिकार्यांना क्लीनचिट देण्यात येत आहे.शेतकर्यांचे मालाला हमी भावाने खरेदी करून शेतकर्यांना बिनव्याजी कर्ज तातडीने उपलब्ध करून द्यावे, अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान भरपाई देण्याची आवश्यकता आहे. कोविड 19 च्या काळात महाराष्ट्र राज्य हे एकमेव असे राज्य आहे की ज्याने कोणत्याही प्रकारचे पॅकेज जाहीर केलेले नाही कर्नाटक, हरियाणा, गुजरात, दिल्ली, केरळ या सर्व राज्यांनी काही हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. आरोग्य विभागाला पीपीई किटस नाहीत.कुठेही विलगिकरणाची सोय नाही.प्रवासी मजूर उपाशी आहेत त्यांचेसाठी पोकळ घोषणा केलेले आहेत. वृत्तपत्र वितरणावर बंदी घालणार्या या शासनाने दारू विक्रीसाठी तत्परता दाखवली आहे. सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या सरकारचा आम्ही निषेध करतो असे या निवेदनात म्हटले आहे.महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार कोरोना संकट निवारण्यास सपशेल अपयशी ठरत असुन ऊठसुठ केंद्रसरकारकडे बोट दाखविण्याचे काम सत्ताधारी राज्यसरकार करीत आहे याचा निषेध भाजपाच्यावतीने करण्यात आला. भाजपनेते माजी आ.भीमराव धोंडे यांचे नेतृत्वाखाली निवेदन दिले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष हनुमंत थोरवे ,संतोषभैय्या चव्हाण ,पप्पु गर्जे ,बाजीराव वाल्हेकर , तात्या कदम, बाबु कदम, जाकीर कुरेशी,अरुण सायकड यांनी तहसिलदार निलीमा थेऊरकर यांना निवेदन दिले.राज्यशासाने सर्वसामान्यांसाठी आर्थिक पॅकेज घोषित करावे-भीमराव धोंडे
Leave a comment