आ.क्षीरसागर यांच्या मागणीला जयंत पाटील यांच्याकडून प्रतिसाद
बीड । वार्ताहर
जिल्ह्यात रब्बीच्या हंगामात कोणत्याच विमा कंपनीने निविदा प्रक्रियेत भाग घेतला नसल्याने शेतकर्यांना विमा रक्कम भरता आली नाही. प्रधानमंत्री पिका विमा योजनेपासून शेतकरी वंचित राहिले. या खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेपासून शेतकर्यांच्या पीकांना विमा संरक्षण मिळावे अशी मागणी आ.संदिप क्षीरसागर यांनी केली आहे. यावर शासनाने एक समिती नेमली असून विमा कंपनीने पीक विमा संरक्षण प्रक्रियेत भाग न घेतल्यास शासन बीड जिल्ह्यातील शेतकर्यांच्या पीकांना विमा संरक्षण देईल असे आश्वासन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले आहे. ते व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसोबत बोलत होते.
मंगळवारी सकाळी 10.30 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी आ. क्षीरसागर यांनी बीड मतदार संघातील विविध विषय मांडले. बीड मतदार संघात सीसीआयचे पाच पणनचे तीन असे एकूण 8 कापूस खरेदी केंद्र मंजूर आहेत. यातील पाचच कापुस खरेदी केंद्र सुरू असून दोन कापुस खरेदी केंद्र ग्रेडर नसल्यामुळे बंद आहे. नागपुरहून आलेल्या 19 ग्रेडरपैकी अधिकचे ग्रेडर बीड मतदार संघासाठी देवून कापूस खरेदी केंद्राची संख्या वाढवून खरेदीची दैनंदिन क्षमता वाढवण्यात यावी. ज्या शेतकर्यांची कापुस नोंदणी नाही अशा शेतकर्यांची नोंदणी करून कापुस खरेदी करण्यात यावी. बीड तालुक्यासाठी 22 हजार मेट्रीक टनपेक्षा अधिकचे खत व बि-बियाणे लागणार असून त्याची टंचाई होणार नाही लॉकडाऊनच्या या काळात व्यापारी, शेतकरी बांधव यांना कसल्याही प्रकारच्या अडचणी येता कामा नये यासाठी खबरदारी घेण्यात यावी. बीड जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत. त्याचा परिणाम कोरोनाच्या परिस्थितीत काम करतांना दिसून येत आहे. हे रिक्त पदे तातडीने भरण्यात यावे. त्यासाठी शासनस्तरावर विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात यावी, तुर हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात यावेत, बीड जिल्ह्यासाठी 30 व्हेंटीलेटर मंजूर झाले असून ते लवकर उपलब्ध व्हावेत अशा विविध मागण्या आ.संदिप क्षीरसागर यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष मंंत्री जयंत पाटील यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. मंत्री जयंत पाटील यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत असतांना आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्याकडून बीड मतदार संघातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. बीड विधानसभा क्षेत्रात ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही, गरजुवंत आहेत अशा जवळपास 10 हजार लोकांपर्यंत बीड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने गहु, तांदुळ व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे असे आ.संदिप क्षीरसागर यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मंत्री जयंत पाटील यांना सांगितले आहे.
डीसीसीने अनुदानाच्या रक्कमा द्याव्यात
बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे शासनाकडून दुष्काळी अनुदान, पीक विमा व इतर अनुदानापोटी जवळपास 400 कोटी रूपये देण्यात आलेले आहेत. जिल्हा बँकेकडून गावपातळीवर शेतकर्यांना त्याचे वितरण होत नाही. शेतकर्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळत नाहीत. डिसीसी बँक जाणीवपुर्वक टाळाटाळ करत आहे. कोरोनाच्या या संकटकाळात अनुदानापोटी आलेल्या पैसे शेतकर्यांना तात्काळ मिळावेत यासाठी शासनाने डिसीसी बँकेला आदेशित करावे नसता कार्यवाही करावी अशी मागणी आ.क्षीरसागर यांनी केली.
Leave a comment