जिल्हाधिकारी रेखावार यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे
बीड । वार्ताहर
कोरोना कक्षात वेळेवर जेवण व पाणी तसेच इतर आवश्यक सुविधा मिळत नाहीत अशास्थितीत स्वत:चे जीव धोक्यात घालून उपचार कसे करावे? असा सवाल करत मंगळवारी (दि.19) जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. अखेर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेऊन आंदोलक डॉक्टरांशी संवाद साधून मध्यस्थी केली. त्यानंतर डॉक्टरांनी उपचाराची तयारी दर्शवली.
बीड जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोविड -19 कक्षात चार बाधीत रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान, कोविड कक्षात रुग्णांची सेवासुश्रूषा करणार्या डॉक्टरांना विश्रांती कक्ष नाही, क्वारंटाईन राहण्यासाठी प्रशासनाने सुविधा दिलेली नाही. पीपीई कीटमध्ये काम करताना तहान, भूक विसरावी लागते, तसेच नैसर्गिक विधीलाही अडचणी येतात. त्यामुळे आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन द्या, अन्यथा उपचार करणार नाहीत, असा पवित्रा घेत मंगळवारी सकाळी डॉक्टरांनी आंदोलन सुरु केले. जिल्हा रुग्णालयाच्या आवारात एकत्रित येत डॉक्टरांनी असहकार्याची भूमिका घेतली. ही माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या दालनात त्यांनी आंदोलक डॉक्टरांना बोलावून घेत संवाद साधला.
निष्ठापूर्वक कर्तव्य बजवा,अन्यथा कारवाई
जिल्हाधिकार्यांची डॉक्टरांना ताकीद
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी डॉक्टरांच्या समस्या जाणून घेतल्या. डॉक्टरांनी क्वारंटाईन राहण्यासाठी हॉटेलात सोय करण्याची मागणी केली. त्यावर त्यानंतर इतर जिल्ह्यांप्रमाणे आपणास योग्य त्या सुविधा दिल्या जात आहेत. इतर ठिकाणी अशी काही सोय केलेली असेल तर ती केली जाईल, असे आश्वासन दिले. प्रशासन पाठीशी असल्याची ग्वाही दिली. याचवेळी जिल्हाधिकार्यांनी डॉक्टरांचे कानही टोचले. ही प्रशासनाला वेठीस धरण्याची वेळ नाही. संकटाच्या परिस्थितीत एकत्रित येऊन लढले पाहिजे, याची आठवण करुन देत प्रामाणिकपणे आणि निष्ठापूर्वक कर्तव्य बजवा, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला. जिल्हाधिकार्यांनी ताकीद दिल्यानंतर डॉक्टर ताळ्यावर आले आणि त्यांनी उपचारासाठी तयारी दर्शवली.
दोन डॉक्टरांना नोटीस
कोरोना कक्षातील रुग्णांवर उपचारास नकार देत दोन वैद्यकीय अधिकार्यांनी अरेरावी केली. ड्युटी लावण्यावरुन वरिष्ठांशी वाद घातला. त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दोन वैद्यकीय अधिकार्यांना नोटीस बजावली आहे. 24 तासाच्या आत खुलासे सादर करावेत अशा सूचनाही डॉ. थोरात यांनी दिली आहे.
शक्य तितक्या सुविधा देणार-डॉ.थोरात
कोरोना कक्षात काम करणार्या डॉक्टरांना पर्सनल प्रोटेक्शन ईक्पिममेन्ट (पीपीई) कीटमुळे अडचणी येतात त्यामुळेच त्यांना अवघ्या चार तासांची ड्युटी देत नियोजन केलेले आहे. कोविड कक्षात सर्व त्या सुविधा दिल्या जात आहेत. जिल्हा रुग्णालय प्रशासन शक्य त्या सुविधा पुरवित आहे. डॉक्टरांनी आपले कर्तव्य निष्ठापूर्वक बजवावे असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी डॉक्टरांना केले आहे.
कोणतीही कमतरता भासू देणार नाही-धनंजय मुंडे
डॉक्टरांनी ठिय्या आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. या आंदोलनाची पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी तात्काळ दखल घेतली असून कोरोनाशी लढणारे डॉक्टर्स, इतर सर्व कर्मचारी, रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक यापैकी कोणालाही जेवण, पाणी तसेच इतर कोणत्याही व्यवस्थेबाबत कमतरता भासू नये अशा सक्त सूचना जिल्हा आरोग्य विभागाला दिल्या कोणत्याही परिस्थितीत निधी किंवा अन्य कोणत्याही बाबींची कमतरता भासू देणार नाही, डॉक्टर्स व अन्य आरोग्य कर्मचार्यांनी धैर्याने काम करावे असे मुंडे यांनी म्हटले आहे.
Leave a comment