बीड । वार्ताहर
डॉ. बाबासाहेबांचा विचार कृतीप्रवण करुया या विषयावर बलभीम महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.मनोहर सिरसाट हे बोलत होते.सम्यक संकल्प या फेसबुक लाईव्ह पेजवरून बुध्द-फुले-आंबेडकर जयंती महोत्सव-2020 च्या निमित्ताने ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.बीड जिल्ह्या मुप्टाचे कृतिशील जिल्हाध्यक्ष मा. प्रदीप रोडे सर यांच्या संकल्पनेतून कोरोणाच्या महाभयंकर संकटाच्या काळातही महापुरुषांच्या विचारांचा जागर सुरू रहावा यासाठी बुध्द-फुले-शाहू जयंतीनिमित्त विविध तज्ज्ञ अभ्यासकांच्या लाईव्ह व्याख्यान व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.
व्याख्यानमालेचे आठवे पुष्प गुंफताना प्रा.डॉ.मनोहर सिरसाट यांनी आज आपण बाबासाहेबांच्या विचारांची कृतिशील भूमिका घेण्याची गरज आहे.त्यांनी आपलं उभं आयुष्य उपेक्षित,वंचित घटकांसाठी खर्ची घातले,त्यांचा विचार संपूर्ण समाजाला कवेत घेणारा आहे.ज्यांचं ज्यांचं शोषण होतं त्या सर्वांना त्यातून मुक्त केले पाहिजे शोषणमुक्तीचा विचार त्यांनी मांडला.निसर्गानं दिलेलं सर्वांना मिळालं पाहिजे ही भूमिका बाबासाहेबांची होती.इथल्या व्यवस्थेने विषमता निर्माण केली.त्या विषम व्यवस्था परिवर्तनाचा विचार ते मांडतात. समतेच्या बाजूने बाबासाहेब उभे राहून इथला माणूस प्रतिष्ठीत करू पाहतात.समताधिष्टीत समाज रचनेसाठी अहोरात्र काम करतात.कोळशाच्या खाणीत स्वत: अनुभूती घेतात. सामान्यांच्या पातळीवर जाऊन विचार करतात.लोकशाहीत सामान्य माणसाला प्रतिष्ठीत होण्याची संधी उपलब्ध आहे.बाबासाहेबांना क्रांतीचा रक्तरंजीत मार्ग मान्य नाही.तर संविधानीक मार्गाचा अवलंब केला पाहिजे ही भूमिका त्यांनी घेतली.रक्ताचा एक थेंबही न सांडता लोकांसाठी अमुलाग्र बदल करणे म्हणजे लोकशाही हा विचार बाबासाहेबांनी रुजवला.व्यक्तीपूजेला त्यांनी विरोध केला.ते म्हणतात विभूती पूजा ही हुकूमशाही कडे जाते त्यासाठी आपलं स्वातंत्र्य त्याच्या चरणी अर्पण करू नका.आपल्या मनात त्यांच्याविषयी कृतज्ञता असावी परंतु स्वाभीमानाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करणे योग्य नाही.आपलं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी व्यक्तीपूजा ठोकरली पाहिजे ही भूमिका बाबासाहेब घेतात.
राजकीय लोकशाही बरोबर सामाजिक लोकशाही रूढ झाली पाहिजे कारण सामाजिक लोकशाही हा जीवनमार्ग आहे.त्यासाठी समाजात त्या पध्दतीने काम करावे लागणार आहे.समतेचा सर्वत्र अभाव दिसतो आहे.त्यासाठी कृतीप्रवण होणं गरजेचं आहे.सर्वांना आत्मनिर्भर करणे तुमची आमची जबाबदारी आहे असे डॉ.मनोहर सिरसाट यांनी सांगितले.त्याचबरोबर ज्यांचं शोषण झालं त्याचं पोषण करण्याची जबाबदारीही आपण घेतली पाहिजे.शेतकरी, शेतमजूर,शेतीवर आपलं जीवन व्यथीत करणारा प्रत्येकजण आज हवालदिल आहे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.या व्याख्यानाबध्दल जयंती उत्सव समितीचे व व्याख्यानमालेचे संयोजक प्रा.प्रदीप रोडे सर व संयोजनसमितीचे सर्व सदस्य यांनी डॉ. मनोहर सिरसाट यांचे आभार मानले.
Leave a comment