पाटोदा । वार्ताहर
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथून जालना जिल्ह्यातील अंबडला जाण्यासाठी निघालेल्या एका तरुणाचा दुचाकी अपघातात गंभीर मार लागल्याने मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना तालुक्यातील नायगाव घाटात शनिवारी (दि.16) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. प्रवासासाठी त्याने पोलीस प्रशासनाकडून रितसर ई-पासही मिळवला होता, पण गावी पोहचण्याआधीच त्याचा अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
पोलीसांच्या माहितीनुसार, सुर्यभान दादाराव शिंदे (25, रा.अंबड, जि.जालना) असे अपघाती मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. शनिवारी सुर्यभान हा त्याच्या दुचाकीवरुन (एम.एच.17 बी.जी.6706) करमाळा येथून अंबडला जाण्यासाठी निघाला होता. तो दुचाकीवर एकटाच होता, शिवाय त्याचे वडिल व इतर मंडळी दुसर्या एका वाहनातून पुढे जात होते. सुर्यभानने दुचाकीवर पिशव्या सोबत घेतल्या होत्या. नायगावच्या वळण घाटातून जाताना त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले अन् दुचाकी रस्त्यालगत जावून आदळली. यात त्याच्या डोक्यासह छातीला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पाटोदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान दुचाकीवर प्रवासाचा पास आढळून आला. नंतर फोनवरुन ही माहिती त्याच्या वडिलांना देण्यात आली. पो.ना.मोटे या प्रकरणाचा तपास करत आहेत. लॉकडाऊनमध्ये अडकल्यानंतर रितसर परवानगी घेवून गावी परतताना रस्ते अपघातात तरुणाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
Leave a comment