कर्मचार्याची पोलीस ठाण्यात पैसे घेण्याची मजल गेलीच कशी?
एसपी पोद्दार हे चाललयं काय?
बीड । वार्ताहर
लॉकडाऊनदरम्यान पकडलेल्या दुचाकी सोडण्यासाठी काही पोलीस पैशांची मागणी करत असल्याचा प्रकार बीडमध्ये उघडकीस आला आहे. याबाबत शिवाजीनगर ठाण्यातील एक व्हिडिओ समोर आल्यानंतर आता जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी याप्रकरणी उपअधीक्षक भास्कर सावंत यांना चौकशीचे आदेश दिले. नंतर पैसे घेणार्या कर्मचार्याला तडकाफडकी निलंबितही करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षकांनी तातडीने केलेल्या या कारवाई स्वागत होत आहे मात्र पोलीस दलात नेमकं चाललयं काय? पोलीस कर्मचारीच नागरिकांकडून चक्क पोलीस ठाण्यात पैसे घेणार असतील तर अशा पोलीसांना वरिष्ठांचा काही धाक राहिला आहे की नाही? असा सवाल जनमानसातून व्यक्त केला जावू लागला आहे.
लॉकडाऊनदरम्यान एका व्यक्तीची दुचाकी शिवाजीनगर ठाण्यात पकडण्यात आली होती. त्यासदंर्भात दुचाकीचालक संबंधित ठाण्यात गेला होता. तेव्हा तिथे त्यास एका पोलीस कर्मचार्याकडून पैशाची मागणी झाली. याबाबतचा एक व्हिडिओ सोमवारी दुपारी व्हायरल झाला. त्या व्यक्तीने काही पैसै दिल्यानंतरही पोलीस कर्मचारी आणखी पैसे आण अशी मागणी करत दिलेले पैसे खिशात घालताना या व्हिडिओत दिसत आहे. याबाबत समाजमाध्यमावर चांगलीच चर्चा होत असून पैशाची मागणी करणार्या पोलीसावर कारवाईची मागणी झाली. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत यांना शिवाजीनगर ठाण्यात जावून प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर काही वेळातच एसपी हर्ष पोद्दार यांनी संबंधित पोलीसाला निलंबित केले असल्याची माहिती दिली. दरम्यान यापूर्वीही चेकपोस्टवर एसपींनी केलेल्या स्टींग ऑपरेशनदरम्यान डमी प्रवाशाला जिल्ह्यात प्रवेश देण्यासाठी पैशाची मागणी केल्याप्रकरणी तीन पोलीसांना निलंबित करण्यात आले आहे. त्यानंतर आता पुन्हा शिवाजीनगर ठाण्यातील पोलीस कर्मचारी पैसे घेतानाचा व्हिडिओ समोर आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. एसपी पोद्दार यांचा अशा पोलीसांना काही धाक राहिला नसल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
पोलीस कर्मचारी बालाजी मुळे निलंबित
दुचाकी सोडण्यासाठी नागरिकाकडून पैसे स्विकारताना शिवाजीनगर ठाण्यातील पोलीस कर्मचारी बालाजी मुळेचा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाल्यानंतर दुपारी चार वाजता त्यास पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले. स्वत: पोलीस अधीक्षक पोद्दार यांनी याबाबत माहिती दिली. या कारवाईमुळे लाचखाऊ पोलीसांमध्ये खळबळ उडाली आहे
Leave a comment