धारूर । वार्ताहर
तालुक्यात ऊसतोड कामगार परतल्यामुळे ग्रामीण भागात पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. पंचायत समितीचे अधिकारी हेकेखोरपणे वागत असल्यामुळे नागरिकांत तीव्र नाराजी पसरली आहे. तालुक्यात सध्या तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. नागरिकांच्या पाठपुराव्यामुळे चार टँकर सध्या सुरू झाले असून 20 ठिकाणी अधिग्रहण केले आहे. 30 ठिकाणच्या अधिग्रहणाची मागणी आहे.
धारूर हा डोंगराळ तालुका असल्यामुळे प्रतिवर्षी 4 महिने पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. या वर्षी मागील एक महिन्यात ऊसतोड कामगार आपल्या गावाकडे परतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात पाणी टंचाईची तीव्रता वाढली आहे. घागरभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागते.नागरिकांच्या सतत पाठपुराव्यानंतर कोळपिंप्री, आसोला, आईचा तांडा येथील पाण्याचे टँकर मंजूर झाल्याने थोडे फार समाधान लाभले. आजही अनेक वाड्या -तांड्यासह गावांना तीव्र पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. आसरडोह अंतर्गत तांडे, उमेवाडी, रूईधारूर खोडस गोपाळपूर आदी गावे पाणी टंचाईने हैराण असताना बीडीओ पाणी टंचाईकडे दुर्लक्ष करीत आहेत. तालुक्यातील 20 ठिकाणी अधिग्रहण झाले आहेत, तर 30 ठिकाणी विंधन विहीर किंवा विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव आले आहेत. या मनमानीमुळे कर्मचार्यांना ग्रामस्थांच्या रोषाचा सामना करावा लागतो.
Leave a comment