आष्टी :प्रतिनिधी
तालुक्यातील धानोरा शिवारात एका पत्र्याच्या जवळ शेडजवळ कुजलेल्या अवस्थेत सापडलेला मृतदेह परजिल्ह्यातील एका ऊसतोड कामगाराचा असल्याचे समोर आले आहे. लॉकडाऊनमध्ये उपाशीपोटी चालून थकल्यामुळे इसमाचा मृत्यु झाल्याचे आरोग्य प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पिंटू मनोहर पवार (वय 40, रा.धोपठे पोंडूळ, ता.मानवत, जि.परभणी) असे त्या मयत व्यक्तीचे नाव आहे. या व्यक्तीचा मृतदेह सापडल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली होती. त्यानुसार अंभोरा पोलिसांसह आरोग्य प्रशासनाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी मयताच्या खिशात एक चिट्ठी सापडली त्यातील भ्रमणध्वनीवर पोलिसांनी संपर्क साधला, तेव्हा या व्यक्तीची खातरजमा करुन ओळख पटली. अंभोरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर मयत व्यक्ती ऊसतोड मजूर असून तो ऊसतोडी संपल्यानंतर पुणे येथे त्याचे भावाकडे राहत होता. परंतु लॉकडाऊनमध्ये अडकल्यामुळे त्याला गावी जाता येत नव्हते. त्यामुळे तो पुणे येथून एक आठवड्यापूर्वी पायी गावी निघाला होता अशी माहिती मिळाली आहे.
प्रशासनानेच केले अंत्यसंस्कार
सदर मयताचे नातेवाईक यांनी त्याचे प्रेत घेऊन जाणे शक्य नसल्याचे सांगितल्याने सदर मयातावर जागेवर पोस्टमार्टम करून त्याच ठिकाणी नातेवाईकांच्या परवानगीने ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
Leave a comment