बीड । वार्ताहर
कोरोनाबाधित महिलेचा सोमवारी पहाटे जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर नगरपालिका प्रशासनाकडून त्यांच्यावर शहरातील भगवान बाबा प्रतिष्ठान परिसरात स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याची तयारी करण्यात आली, मात्र स्थानिक नागरिकांनी इथे अंत्यसंस्कार करु नका अशी भूमिका घेत विरोध केला. त्यानंतर पोलीसांनी समजुत काढल्यानंतर त्या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नवी मुंबईतून एकाच कुटुंबातील 7 जण 13 मे रोजी बीड जिल्ह्यात परतले होते. अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळगाव खुडा येथील रहिवाशी असलेले हे कुटूंब वाहन ई-पास काढून आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे नातेवाईकांकडे आल्यानंतर त्यांचे शेतात अलगीकरण करण्यात आले होते.दरम्यान लक्षणे जणू लागल्यानंतर त्यांनी आरोग्य विभागाला माहिती दिली, त्यानंतर सर्वांना आरोग्य पथक पाठवून स्वॅब घेण्यासाठी शनिवारी रात्री जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी या सर्वांचे स्वॅब पॉझिटिव्ह आल्याने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली, शिवाय जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढून 9 वर पोहोचली, असे असतानाच विलगीकरण कक्षात उपचार घेणार्या 65 वर्षीय महिलेचा सोमवारी पहाटे मृत्यू झाला. या महिलेवर भगवान बाबा प्रतिष्ठान परिसरात स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र ही माहिती मिळाल्यानंतर स्थानिकांनी तिथे येत अंत्यसंस्कारास विरोध केला, मात्र पोलीस अधिकारी, पालिका प्रशासन व आरोग्य विभागाच्या अधिकार्यांनी नागरिकांची समजुत घातली, त्यानंतर महिलेवर अंत्यसंस्कार झाले. यावेळी पो.नि.सुनील बिर्ला यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Leave a comment