उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या महिलेवर बीडमध्ये होणार अंत्यसंस्कार

बीड | वार्ताहर 

 

एकही रुग्ण नसणाऱ्या बीड जिल्ह्यात दोन दिवसात 9 कोरोना बाधित झाल्याने खळबळ उडाली असतानाच आता  जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेणाऱ्या यातील एका कोरोना पॉझिटिव्ह 65 वर्षीय महिलेचा आज सोमवारी (दि.18) पहाटे मृत्यू झाला.त्यामुळे जिल्ह्यात चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे सदर महिलेचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.दरम्यान नगरपालिका, आरोग्य विभागाकडून शहरातील भगवान बाबा प्रतिष्ठानच्या स्मशानभूमीत मृत महिलेवर दुपारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.दुसरीकडे आज 77 जणांचे स्वॅब नमुने तपासणीला प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

मयत महिला मूळची नगर जिल्ह्यातील पिंपळगाव खोडा येथील असून त्यांचे कुटुंबीय आष्टी तालुक्यात पाटण सांगवी येथे सुनेच्या माहेरी आले होते. नवी मुंबईतून एकाच कुटुंबातील 7 जण 13 मे रोजी बीड जिल्ह्यात परतले होते. अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळगाव खुडा येथील रहिवाशी असलेले हे कुटूंब वाहन ई-पास काढून आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे नातेवाईकांकडे आल्यानंतर त्यांचे शेतात अलगीकरण करण्यात आले होते.दरम्यान लक्षणे जणू लागल्यानंतर त्यांनी आरोग्य विभागाला माहिती दिली, त्यानंतर सर्वांना आरोग्य पथक पाठवून स्वॅब घेण्यासाठी शनिवारी रात्री जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी या सर्वांचे स्वॅब पॉझिटिव्ह आल्याने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली, शिवाय जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढून 9 वर पोहोचली, असे असतानाच विलगीकरण कक्षात उपचार घेणाऱ्या 65 वर्षीय महिलेचा सोमवारी पहाटे मृत्यू झाला, त्यामुळे बीड जिल्ह्यात आता अधिक चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान बीड जिल्ह्यात परजिल्ह्यातून आलेल्या व होम क्वारंटाईन असलेल्या व्यक्तींची संख्या 192 असून 40 जण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आहेत. रविवारी सायंकाळपर्यंत  46 हजार 775 ऊसतोड मजूर जिल्ह्यात परतले आहेत.

डॉक्टरांनी दिला रुग्णांना धीर

जिल्हा सामान्य रुग्णालयात आता 8 कोरोना बाधीत रुग्णावर उपचार सुरू आहेत.यात इटकूरच्या लहान मुलीसह हिवरा येथील एक तरुण आणि मूळचे नगर जिल्ह्यातील पिंपळगाव खोडा येथील एकाच कुटुंबातील 6 जणांचा समावेश आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिशन पवार यांनी  इटकूर व हिवऱ्याच्या रुग्णाशी फोनवरून संवाद साधत त्यांना 'आम्ही योग्य उपचार करत आहोत, तुम्ही पूर्णपणे बरे व्हाल,' असे सांगत धीर दिला, त्यांच्याशी मोकळेपणाने चर्चा केली.

बाधित रुग्णांवर प्रथमच उपचार

मागील दीड महिन्यापासून बीड जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्व यंत्रणा यापूर्वीच सज्ज ठेवण्यात आलेली आहे.विलगीकरण कक्षात  संशयितांचे स्वॅब घेण्याचे काम केले जात होते. मात्र शनिवारी दोन आणि त्यानंतर रविवारी एकाच कुटुंबातील सात जण कोरोना बाधित झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाल्यानंतर आता जिल्हा रुग्णालयात सर्व  8 बाधित रुग्णांवर पहिल्यांदाच डॉक्टर आणि परिचारिकाकडून योग्य उपचार केले जात आहेत.

नव्याने 77 स्वॅब तपासणीला पाठवले

आज सोमवारी सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयातून एकूण 77 जणांचे स्वॅब तपासणीला प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.यात हिवरा येथील कोरोना बाधिताच्या संपर्कातील 42 ते इटकूर येथील बाधित मुलीच्या संपर्कातील 8 असे 50 तर बीडमधून इतर 11, अंबाजोगाईत 15 आणि परळीत 1 असे 27 व हे सर्व मिळून 77 स्वॅब तपासणीला पाठवण्यात आले आहेत. जिल्ह्यात आजपर्यंतचे एकूण ५१० स्वॅब तपासले गेले असून  यातील ४२४ अहवाल निगेटिव्ह तर 9 अहवाल पाॅझिटिव्ह ठरले असून आजचे  77 अहवाल प्रलंबित आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.