बीड । वार्ताहर
कोरोनाबाधित आढळलेली गेवराई तालुक्यातील इटकूर येथील 12 वर्षीय मुलगी एकूण 12 जणांच्या संपर्कात आल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी 3 जणांची कोरोना चाचणी पूर्ण झाली. त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे तर माजलगाव तालुक्यातील हिवरा येथील रुग्ण 36 जणांच्या संपर्कात आल्याचे रविवारी दुपारपर्यंत स्पष्ट झाले होते. या सर्वांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. हा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे.
मुंबईहून आलेले गेवराई व माजलगाव तालुक्यातील दोघे कोरोनाबाधित आढळल्यानंतर आरोग्य विभागाकडून आता त्यांची संपर्क शोध मोहिम राबवली जात आहे. इटकूर येथील 12 वर्षिय मुलगी ही तिच्या आई, वडिल, भाऊ, मामा व घरातील इतर सदस्य अशा 11 आणि मातोरी चेकपोस्टवरील एक पोलिस कर्मचारी अशा एकूण 12 जणांच्या संपर्कात आली आहे. पैकी आई, वडिल व भाऊ यांची कोरोना चाचणी यापूर्वीच झाली असून अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.इतर 9 जणांचे स्वॅब घेतले जाणार आहेत. तर, रविवारी दुपारपर्यंतच्या माहितीनुसार, हिवरा येथील तरुण 36 जणांच्या तो संपर्कात आल्याचे स्पष्ट झाले होते. त्या सर्वांचे स्वॅब घेतले जात आहेत. सोमवारी सकाळी ते तपासणीसाठी पाठवून सोमवारी सायंकाळी त्याचा अहवाल येईल अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी. पवार यांनी दिली.
आरोग्य सर्वेक्षणात इतर संशयितही सापडले
दरम्यान, गेवराई तालुक्यातील इटकूरमध्ये बाधितांच्या संपर्कात नसलेले मात्र, लक्षणे असलेले आणखी दोघे आरोग्य आढळले आहेत. तर कुंभारवाडीत दोघे संशयित सापडले. त्यांचेही स्वॅब घेतले जाणार आहेत. माजलगाव तालुक्यातील रिधोरी येथेही एक संशयित वृद्ध आढळला आहे. गेवराई, माजलगाव व बीड येथील विलगीकरण कक्षात दाखल करण्याची प्रक्रिया उशीरापर्यंत सुरु होती.
Leave a comment