आष्टीतील एकाच कुटूंबातील सात जण पॉझिटिव्ह
मुंबईहून आष्टी तालुक्यापर्यंत केला होता प्रवास
बीड । वार्ताहर
येथील जिल्हा सामान्य रूगणालयाच्या विलगीकरण कक्षातून रविवारी पाठवलेले सात जणांचे स्वॅब रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेले हे सातही जण एकाच कुटूंबातील आहेत.त्यामुळे आता जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधीत रूग्णांची संख्या 9 वर पोहोचली आहे.
कोरोना बाधीत हे सातही जण मुळचे अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळगाव खुडा येथील रहिवासी असून यात पाच पुरूष व दोन महिलांचा समावेश आहे. हे सर्वजण 66, 65, 43, 38, 36, 10, 6 वयोगटातील आहेत. 13 मे रोजी ते मुंबईतून निघाले होते. 14 मे रोजी ते सर्वजण आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे नातेवाईकांकडे आल्यानंतर त्यांना शेतात क्वॉरंटाईन केले होते. दरम्यान लक्षणे जाणवू लागल्यानंतर त्यांनी आरोग्य विभागाशी संपर्क केला. त्यानंतर आरोग्य पथक पाठवून शनिवारी रात्री त्यांना जिल्हा रुग्णालयात आणून त्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. नंतर सर्व स्वॅब तपासणीसठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. रविवारी रात्री त्यांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले. दरम्यान मुंबईतून बीड जिल्ह्यात परतलेल्या दोघाचे रिपोर्ट शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर बीड जिल्ह्यात खळबळ उडाली होती. नंतरचे 22 अहवाल निगेटिव्ह आल्याने काही वेळापुरताच दिलासा मिळाला परंतू त्यानंतर सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
आजपर्यंत जिल्ह्यातून तपासणीसाठी पाठवलेल्या एकूण निगेटिव्ह रिपोर्टची संख्या 424 झाली आहे. तर नऊ रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत. जिल्ह्यात एकूण 433 स्वॅब तपासले गेले आहेत. पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेल्या गाव परिसरातील माजलगाव, गेवराई व बीड तालुक्यातील एकूण 30 गावे अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहेत. या गावांमध्ये घरोघर नागरिकांचे आरोग्य सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे. दरम्यान बीड जिल्ह्यात परजिल्ह्यातून आलेल्या व होम क्वारंटाईन असलेल्या व्यक्तींची संख्या 192 असून 40 जण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आहेत. रविवारी सायंकाळपर्यंत 46 हजार 775 ऊसतोड मजूर जिल्ह्यात परतले आहेत.
कंटेनमेंट झोनमध्ये आरोग्य सर्व्हेक्षण
इटकुर (ता.गेवराई) येथील कँटेन्मेंट झोनमध्ये 7 गावांचा समावेश असून त्याची लोकसंख्या 4 हजार 740 असून त्यामध्ये रविवारी एकूण 1 हजार 275 घरांचा सर्व्हे करण्यात आला तर हिवरा (ता.माजलगाव) येथील कँटेन्मेंट झोनमध्ये 5 गावांचा समावेश असून त्यांची लोकसंख्या 3 हजार 397 असून त्यामध्ये रविवारी एकूण 695 घरांचा सर्व्हेक्षण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी दिली.
22 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह
बीड जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षातून रविवारी सकाळी 27 जणांचे तर केज उपजिल्हा रुग्णालयातून 2 संशयितांचे असे एकूण स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. यातील बीडमधील 20 आणि केजचे 2 असे 22 जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले तर बीडमधून स्वॅब पाठवलेल्या आष्टी तालुक्यातील उर्वरित 7 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
आष्टी तालुक्यातील 13 गावे लॉक
आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे कोरोना विषाणूचे लागण झालेले रुग्ण आढळुन आल्यानंतर बीड जिल्ह्यात इतर ठिकाणी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणुन रविवारी (दि.17) रात्री आरोग्य विभागाकडून सांगवी पाटण गावापासून 3 कि.मी.परिसरातील सांगवी पाटण, खिळद, पाटण, कोहीनी, कारखेल तांडा हा परिसर कंटेटमेन्ट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. तर पुढील 4 कि.मी. परिसरातील लिंबोडी, धामणगांव, सुर्डी, कारखेल बु.,डोईठाण, बावी, लाटेवाडी व महाजनवाडी ही सर्व गावे बफर झोन म्हणून घोषित करण्यात आली आहेत. सर्व गावे व परिसर पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येवून संचारबंदी लागू करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली आहे.
Leave a comment