सात हजार सातशे नागरिकांची होणार तपासणी
बीड | वार्ताहर
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षातून शनिवारी (दि.16)पाठवलेल्या सहापैकी दोन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर संपूर्ण बीड जिल्हा प्रशासन पुढील उपाय योजनेच्या कामाला लागले आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी माजलगाव गेवराई आणि बीड तालुक्यातील तब्बल 30 गावे कंटेंटमेंट आणि बफर झोन म्हणून जाहीर केले आहेत. या आदेशानुसार आता या सर्व गावात अनिश्चित काळासाठी बंद ठेवून पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानंतर आता नागरिकांचे घरोघरी आरोग्य सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.यासाठी आरोग्य विभागाच्या स्वतंत्र टीम नियुक्त करण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी दिली.
गेवराई तालुक्यातील इटकूर येथील कंटेंनमेंट झोनमधील गावांत १४ पथकांद्वारे ८५० घरांतील ४ हजार ७०० नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण रविवारपासून सुरू करण्यात आले आहे. तसेच माजलगाव तालुक्यातील हिवरा कंटेनमेंट झोनमधील गावांत ७ पथकांकडून ८५० कुटुंबातील ३ हजार नागरिकांचे सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे.
शनिवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विलगीकरण पक्षातून सहा जणांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते.रात्री यातील दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, तर उर्वरित चार रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत. दरम्यान आष्टीतील एका रुग्णाचा अपवाद वगळता दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यानंतर ईटकुर आणि हिवरा या गावांच्या परिसरातील बफर व कंटेनमेंट झोनमधील गावे अनिश्चित काळासाठी बंद करत पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांनी याबाबतचे आदेश शनिवारी रात्री जारी केल्यानंतर जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून या सर्व 30 गावांमधील नागरिकांचे घरोघर जाऊन आरोग्य सर्वेक्षण करण्याचे काम घेण्यात आले आहे. यासाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात आली असून यात आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश आहे. दररोज या गावांमध्ये भेटी देऊन सर्वेक्षण केले जाणार आहे. यासाठीचा बी प्लॅन तयार झाला असून कामही सुरू झाले आहे.
२९ जणांचे स्वॅब तपासणीसाठी
आज रविवारी सकाळी बीड जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षातून २७ जणांचे तर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातून 2 संशयितांचे असे एकूण २९ स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली. आता या अहवालाची प्रतिक्षा आहे.
Leave a comment